Headlines

बसस्थानकाजवळ 200 मीटर नियमाचे उल्लंघन:खाजगी वाहतूक सर्रास सुरू, परिवहन मंत्र्यांच्या दौऱ्यानंतरही अमरावतीत परिस्थिती 'जैसे थे'




अमरावती येथील मध्यवर्ती बसस्थानक परिसरात वाहतूक नियमांची सर्रास पायमल्ली होत आहे. बसस्थानकाच्या २०० मीटर अंतराच्या आतूनच बेकायदेशीर खाजगी वाहतूक सुरू असून, यामुळे राज्य परिवहन महामंडळाला (एसटी) मोठा आर्थिक फटका बसत आहे. संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांचे या प्रकारात संगनमत असल्याचा आरोप प्रवासी आणि जागरूक संघटनांकडून केला जात आहे. सकाळी ६ ते रात्री १० वाजेपर्यंत प्रवाशांची पळवापळवी सुरू असते. शासनाच्या नियमांनुसार, एसटी बसस्थानक परिसरापासून २०० मीटरच्या त्रिज्येत कोणत्याही खाजगी प्रवासी वाहनाला प्रवासी भरण्यास सक्त मनाई आहे. मात्र, अमरावतीत या नियमाची अंमलबजावणी केवळ कागदावरच राहिली आहे. विशेष म्हणजे, गेल्या आठवड्यात परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी या बसस्थानकाला भेट दिली होती. त्यांनी व्यवस्थेची पाहणी करून विभाग नियंत्रक आणि बसस्थानक प्रमुखावर कारवाई केली होती, तरीही ही बेकायदेशीर वाहतूक थांबलेली नाही. खाजगी प्रवासी वाहने बसस्थानकाच्या अगदी प्रवेशद्वाराजवळ आणि संरक्षक भिंतीला लागून उभी केली जातात. बसस्थानकाच्या पहिल्या टोकापासून जैन छात्रालयाच्या पुढे २०० मीटर अंतर पूर्ण होते, परंतु खाजगी वाहतूकदार या अंतराच्या आतच ट्रॅव्हल्स उभ्या करून प्रवाशांना आकर्षित करतात. यामुळे एसटीचे नुकसान तर होतेच, शिवाय प्रवाशांची सुरक्षाही धोक्यात येते. सकाळी वृत्तपत्र विक्रेत्यांच्या गर्दीतही खाजगी वाहनांचे एजंट सक्रिय असतात. या ठिकाणाहून धारणी, परतवाडा, मोर्शी, वरुड तसेच मध्यप्रदेशातील बैतुल, छिंदवाडा, मुलताई, होशंगाबाद, भोपाळ अशा लांब पल्ल्याच्या प्रवासासाठी खाजगी बसेस धावतात. खाजगी प्रवासी वाहतूकदारांचे एजंट प्रवाशांना आपल्याकडे वळवण्यासाठी आधीच सक्रिय झालेले असतात. ही बेकायदेशीर साखळी मोडून एसटीचे उत्पन्न वाढवावे आणि प्रवाशांची सुरक्षा सुनिश्चित करावी, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे. खाजगी वाहनधारक बसस्थानकात येणाऱ्या प्रवाशांना कमी भाड्याचे किंवा लवकर पोहोचवण्याचे आमिष दाखवून आपल्या वाहनांकडे वळवतात. यामुळे एसटीच्या गाड्यांना अपेक्षित प्रवासी मिळत नाहीत आणि महामंडळाचे उत्पन्न घटले आहे. अधिकृत बसस्थानक सोडून खाजगी वाहनांमध्ये प्रवास करताना प्रवाशांच्या, विशेषतः महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्नही गंभीर बनला आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *