![]()
पुणे शहर पोलिसांच्या गुन्हे शाखा युनिट ७ ने वाघोली परिसरातून दुचाकी चोरणाऱ्या एका टोळीचा पर्दाफाश केला आहे. या कारवाईत पोलिसांनी तीन आरोपींना अटक करून एका विधीसंघर्षित बालकाला ताब्यात घेतले आहे. त्यांच्याकडून ६ मोटारसायकली आणि ४ मोबाईल फोन असा एकूण ४ लाख ९५ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या कारवाईमुळे लोहगाव, लोणी काळभोर, शिक्रापूर, विश्रांतवाडी आणि भोसरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एकूण ६ चोरीचे गुन्हे उघडकीस आले आहेत. अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे अरसलान मुस्ताक तांबोळी (वय १८, रा. कृष्णकुंज फेज २, बकोरी रोड, वाघोली), सिद्धांत दिलीप वाघमारे (वय १८, रा. वाघोली) आणि अरमान रियाज तांबोळी (वय १८, रा. वाघोली) अशी आहेत. हे सर्वजण वाघोली परिसरातील रहिवासी आहेत. गुन्हे शाखा युनिट ७ चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष सोनवणे, सहाय्यक पोलीस निरीक्षक मदन कांबळे व त्यांचे पथक वाघोली पोलीस स्टेशनच्या हद्दीत गस्त घालत असताना ही माहिती मिळाली. पोलीस अंमलदार नितीन धाडगे यांना गोपनीय माहिती मिळाली की, दुचाकी चोरीच्या गुन्ह्यांतील रेकॉर्डवरील दोन आरोपी वाघोली येथील बायफ रोडवर संशयास्पदरीत्या थांबले आहेत. या माहितीच्या आधारे पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी जाऊन सापळा रचला आणि अरसलान तांबोळी व सिद्धांत वाघमारे या दोघांना ताब्यात घेतले. सुरुवातीला त्यांनी मोटारसायकलबाबत उडवाउडवीची उत्तरे दिली. मात्र, कसून चौकशी केल्यानंतर त्यांनी ती दुचाकी चोरीची असल्याचे कबूल केले. तसेच, त्यांचा साथीदार अरमान तांबोळी आणि एका विधीसंघर्षित बालकाच्या मदतीने पुणे परिसरातील वेगवेगळ्या भागातून आणखी ५ मोटारसायकली चोरल्याची कबुली दिली. या यशस्वी कारवाईमुळे लोहगाव, लोणी काळभोर, शिक्रापूर, विश्रांतवाडी आणि भोसरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एकूण ६ चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्यात पोलिसांना यश आले आहे. पोलिसांनी या टोळीकडून एकूण ४ लाख ९५ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे, ज्यात ६ मोटारसायकली आणि ४ मोबाईल फोनचा समावेश आहे. सदर यशस्वी कारवाई अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) तेजस्वी सातपुते, पोलीस उप-आयुक्त (गुन्हे) गौहर हसन आणि सहाय्यक पोलीस आयुक्त (गुन्हे) राजेंद्र मुळीक यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष सोनवणे यांच्या सूचनेनुसार गुन्हे शाखा युनिट ७ च्या पथकाने केली. या पथकात स.पो.नि. मदन कांबळे, पोलीस अंमलदार सारंग दळे, प्रशांत कापुरे, विनायक साळवे, निलेश साळवे, निर्णय लांडे, गिरीष नाणेकर, ऋषिकेश ताकवणे, सुहास तांबेकर, भरत गुंडवाड, नितीन धाडगे, किरण पलांडे, समाधान पाटील, नेहा तापकीर, सोनाली नरवडे व प्रतिक्षा पानसरे यांचा समावेश होता.
Source link
पुणे पोलिसांकडून दुचाकी चोरणारी टोळी जेरबंद:6 मोटारसायकलींसह 4.95 लाखांचा मुद्देमाल जप्त; गुन्हे शाखा युनिट 7 ची कारवाई