![]()
शहरालगत असलेल्या शिरजगाव बंड ग्रामपंचायत हद्दीतील वार्ड क्रमांक ५, प्रल्हादपूर येथील शिवाजी चौक ते शिवाजी नगरकडे जाणारा रस्ता अक्षरशः उखडलेल्या अवस्थेत आहे. या मार्गावर जागोजागी मोठे खड्डे पडले असून काही ठिकाणी काँक्रिटीकरण पूर्णतः निघून गेल्याने आतील लोखंडी सळ्या उघड्या पडल्या आहेत. परिणामी वाहनधारकांसह पादचाऱ्यांसाठी अपघाताचा धोका वाढला आहे. चांदूर बाजार-वलगाव मार्गावर शिवाजी चौकातून शिवाजीनगरकडे जाणारा हा रस्ता शॉर्टकट म्हणून मोठ्या प्रमाणात वापरला जातो. गुलजार पेठ, चांदूर बाजार व परतवाडा मार्गाला जोडणारा असल्याने या रस्त्यावरून दुचाकी, चारचाकी, ट्रॅक्टर, पिकअप वाहतूक मोठ्या प्रमाणात सुरू असते. याच रस्त्यावरून शाळकरी विद्यार्थी, खासगी शिकवणी वर्गांचे विद्यार्थी तसेच रुग्णांचीही सतत ये-जा असते. या मार्गावर स्त्रीरोग तज्ज्ञांचे रुग्णालय, बालरोग तज्ञांचे दवाखाने तसेच खासगी कोचिंग क्लासेस असल्याने लहान मुले, महिला व रुग्णांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. खड्ड्यांमुळे वाहनांचे टायर फुटण्याचे प्रकार घडत असून उघड्या लोखंडी सळ्यांमध्ये पाय अडकल्याने पादचाऱ्यांना दुखापत झाल्याच्या घटनाही घडल्या आहेत. या मार्गावरुन शिवाजीनगर परिसरात शेतकरी, व्यावसायिक, विद्यार्थी व मंगल कार्यालयांमध्ये ये-जा करणाऱ्यांची संख्याही मोठी आहे.
Source link
चांदूर बाजारमधील रस्ता पूर्ण उखडला:विद्यार्थी, रुग्णांची गैरसोय, लोखंडी सळ्या निघाल्या