Headlines

नागरिकांचा प्रश्न:कुर्डुवाडीमध्ये मोकाट जनावरांचा सुळसुळाट आरोग्य सभापतींची मोहीम ‘नव्याचे 9 दिवस’




शहरातील वाढती रहदारी पाहता प्रमुख रस्त्यांचे रुंदीकरण करण्यात आले असले, तरी मोकाट जनावरांचा प्रश्न अजूनही जैसे थेच आहे. पालिकेच्या वतीने करण्यात येणाऱ्या थातूरमातूर कारवाईनंतर ही मोकाट जनावरे पुन्हा रस्त्यावर नाहीतर थेट रहिवाशांच्या वसाहतींमध्ये ठाण मांडून बसलेली दिसून येत आहेत. दुसरीकडे, प्रशासन मात्र एखादी-दुसरी जुजबी कारवाई करून आपलीच पाठ थोपटून घेण्याचे काम करत असल्याचा संतापजनक आरोप स्थानिक नागरिकांमधून केला जात आहे. ​येथील माढा रोड, छत्रपती शिवाजी महाराज चौक, स्टेशन चौक, भाजी मंडई, बसस्थानक आणि बायपास रोड यासह शहरातील सर्वच प्रमुख मार्गांवर ही जनावरे जत्थ्याने ठाण मांडून बसलेली राजरोसपणे पाहायला मिळत आहेत. याचा नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. ​सध्या ही सर्व मोकाट जनावरे माढा रोड आणि तेथील रहिवासी भागात आणून सोडली जात आहेत. याबाबत स्थानिक नागरिकांनी आरोग्य सभापती मोहसीन मकणू यांना अनेकदा फोटोसह फोनवरून व प्रत्यक्ष भेटून कल्पना दिली, मात्र त्यांच्याकडून या गंभीर तक्रारींची कोणतीही दखल घेतली जात नसल्याचे समोर आले आहे. परिणामी, सभापतींची ही कामगिरी म्हणजे ‘नव्याचे नऊ दिवस’ ठरली असल्याची टीका आता सर्वसामान्य लोकांतून होत आहे. ​शहरातील या गंभीर समस्येवर अनेक सामाजिक संघटना, जागृत नागरिक आणि स्थानिक वर्तमानपत्रांनी सातत्याने आवाज उठवला होता. याची दखल घेत नव्याने नियुक्त झालेले आणि पेशाने डॉक्टर असणारे नगरसेवक मोहसीन मकणू हे आरोग्य सभापती झाले. पदभार स्वीकारताच त्यांनी मोकाट जनावरांना पकडण्याची धडक मोहीम हाती घेतली होती. त्यांच्या या आक्रमक भूमिकेमुळे शहरातील नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले होते. ​आरोग्य सभापती मकणू यांनी खरोखरच एक चांगली सुरुवात केली होती, यात शंका नाही. मात्र, ही मोहीम अशी अचानक थंड बस्त्यात का पडली? मकणू करत असलेल्या प्रामाणिक कारवाईमुळे शहरातील काही बड्या पुढार्‍यांकडून त्यांच्यावर राजकीय दबाव आणला जात आहे का? की कोणाच्या स्वार्थापोटी ही मोहीम थांबवण्यात आली? असे अनेक प्रश्न आता कुर्डुवाडीतील सुजाण नागरिक उपस्थित करत आहेत. कोणत्याही दबावाला बळी न पडता ही मोहीम त्वरित सुरू करावी, अशी मागणी आता जोर धरत आहे. नगरपालिका कर्मचारी पकडायला धजत नाहीत टीम तयार करतोय मागच्या टेंडरची फाईल घेऊन. नगरपालिका कर्मचारी पकडायला धजत नाहीत. लहान जनावरदेखील धरताना मारायला जाते. लवकरच मोहिम चालू करतो आहे. -डॉ. मोहसीन मकन, आरोग्य सभापती नगरपालिका, कुर्डुवाडी मुले, महिला, वृद्धांना बाहेर पडणे मुश्कील गावात मोकाट फिरणारी सगळी जनावरे आता माढा रोड व सातव कॉलनी परिसरात आणून सोडली जात आहेत. जत्थ्याने ही जनावरे येत असल्याने मुले, महिला व वृद्धांना बाहेर पडणे मुश्कील झाले आहे. प्रशासनाची पिंजरा गाडी कुठे दिसत नाही. कारवाई थंड झाली आहे तरी प्रशासनाने यावर तात्काळ उपाययोजना करावी. – हरी भराटे, नागरिक, कुर्डुवाडी पदभार स्वीकारताना आरोग्य सभापतींनी केलेले वक्तव्य शहरातील रस्त्यांवर मोकाट फिरणारे एकही जनावर दिसणार नाही. एक-एक जनावर पकडून गोशाळेत पाठवल्याशिवाय ही कारवाई थांबणार नाही! असे वक्तव्य आरोग्य सभापती डॉ. मोहसीन मकणू यांनी केले होते.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *