Headlines

केतन अग्रवाल हत्या प्रकरणात नवा ट्विस्ट:सियाचा भाऊ साहिलला 10 कोटींची कायदेशीर नोटीस; 'सियाचा वकील कोण?' यावरून कोर्टात रंगला वाद




पुण्यातील बहुचर्चित केतन अग्रवाल हत्या प्रकरणाला आता एक नवे कायदेशीर वळण मिळाले आहे. लोहगड किल्ल्यावरून ढकलून केतनची हत्या करण्याच्या प्रकरणात मुख्य संशयित आरोपी असलेली सिया गोयल हिचा भाऊ साहिल गोयल मोठ्या अडचणीत सापडला आहे. सियाचे वकील असल्याचा दावा करणारे अ‍ॅड. आशुतोष श्रीवास्तव यांनी आता साहिलला थेट 10 कोटी रुपयांच्या नुकसानभरपाईची कायदेशीर नोटीस बजावली आहे. या नोटीसमुळे आणि कोर्टातील घडामोडींमुळे या प्रकरणातील हायव्होल्टेज ड्रामा समोर आला आहे. कोर्टात नेमकं काय घडलं? ‘माझे वकील कोण?’ सोमवारी आरोपी सिया गोयल आणि तिचा प्रियकर चेतन चौधरी या दोघांना वडगाव मावळ न्यायालयात हजर करण्यात आले होते. सुनावणीदरम्यान अ‍ॅड. आशुतोष श्रीवास्तव यांनी कोर्टात सियाच्या बाजूने युक्तिवाद करण्यास सुरुवात केली. मात्र, त्यांना अद्याप सियाचे अधिकृत वकीलपत्र (NOC) मिळाले नव्हते आणि ही बाब गोयल कुटुंबीयांना खटकत होती. अखेर कोर्टासमोर बोलताना सियाने स्पष्ट केले की, “माझे वकील आशुतोष श्रीवास्तव नसून विपुल दुशिंग आहेत.” सियाने हे वक्तव्य केल्याची माहिती तिचा भाऊ साहिल गोयल याने बाहेर दिली आणि त्यानंतर अ‍ॅड. श्रीवास्तव संतापले. अ‍ॅड. श्रीवास्तव यांचा साहिलवर 10 कोटींचा दावा आणि 48 तासांचा अल्टिमेटम या प्रकारानंतर संतप्त झालेल्या अ‍ॅड. आशुतोष श्रीवास्तव यांनी साहिलवर कायदेशीर कारवाईचा बडगा उगारला आहे. साहिलने आपल्यावर खोटे, बिनबुडाचे आणि बदनामीकारक आरोप करून आपल्या व्यावसायिक प्रतिष्ठेला धक्का पोहोचवल्याचा दावा करत त्यांनी 10 कोटी रुपयांची भरपाई मागितली आहे. तसेच पुढील 48 तासांत त्याने सार्वजनिक माफी मागावी आणि भविष्यात असे आरोप न करण्याचे लेखी आश्वासन द्यावे, अशी अट नोटिशीत आहे. श्रीवास्तव काय म्हणाले? “साहिल लोकांमध्ये गैरसमज पसरवत आहे. सियाने वकिलीनाम्यावर सही केलेली आहे, जो ऑन रेकॉर्ड आहे. आम्हाला वकिलीनामा बदलण्याबाबत कोणताही मेल किंवा फोन आलेला नाही. आम्ही साहिलला ओळखत नाही. साहिलवर कुणाचा दबाव आहे का, हे तपासायला हवे,” असा सवाल श्रीवास्तव यांनी उपस्थित केला. सिया आणि चेतनला ३ जुलैपर्यंत पोलीस कोठडी दरम्यान, केतन अग्रवाल हत्या प्रकरणात पोलिसांनी दोन्ही आरोपींच्या पोलीस कोठडीत 7 दिवसांच्या वाढीची मागणी केली होती. दोन्ही बाजूंच्या युक्तिवादानंतर न्यायालयाने सिया आणि चेतनला 3 जुलैपर्यंत म्हणजेच 5 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. डिजिटल तपासावर पोलिसांचा भर 18 जून रोजी लोहगड किल्ल्यावरून ढकलून केतनची हत्या करण्यात आली होती. प्रेम त्रिकोणातून घडलेल्या या कटाची उकल करण्यासाठी पोलीस कसून तपास करत आहेत. या प्रकरणात सियाचा भाऊ साहिल याची 10 तास आणि त्यानंतर तिच्या आई-वडिलांचीही कसून चौकशी करण्यात आली आहे. मात्र, त्यांनी आपल्याला सियाच्या कटाची कोणतीही माहिती नसल्याचा दावा केला आहे. आता पोलीस आरोपी सिया आणि चेतन यांच्या सोशल मीडिया खात्यांचा, व्हॉट्सॲप चॅट्सचा आणि त्यांनी भेट दिलेल्या संकेतस्थळांचा कसून तांत्रिक तपास करत आहेत, जेणेकरून हत्येचा भक्कम पुरावा कोर्टात सादर करता येईल. आता या प्रकरणात अ‍ॅड. श्रीवास्तव यांच्या 10 कोटींच्या नोटिशीला साहिल गोयल काय उत्तर देतो आणि डिजिटल तपासातून आणखी कोणते खुलासे समोर येतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *