Headlines

मेयोचे विभागाध्यक्ष डॉ. जैस्वाल एसीबीच्या ताब्यात:फिटनेस प्रमाणपत्रासाठी RTO अधिकाऱ्याकडे 30 हजारांच्या लाचेची मागणी




नागपूर येथील इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (मेयो) येथे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) मोठी कारवाई केली आहे. वैद्यकीय मंडळाची शिफारस आणि फिटनेस प्रमाणपत्र देण्यासाठी लाच मागितल्याप्रकरणी शल्यचिकित्सा विभागाचे प्रमुख तथा वैद्यकीय मंडळाचे अध्यक्ष डॉ. नंदकिशोर कलमनारायण जैस्वाल आणि लघुलेखक आशिष मेटेकर यांना एसीबीने ताब्यात घेतले आहे. या कारवाईमुळे नागपूरच्या वैद्यकीय आणि शासकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. या प्रकरणातील तक्रारदार हे वर्धा येथील उप प्रादेशिक परिवहन कार्यालयात (आरटीओ) सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक म्हणून कार्यरत आहेत. ते गेल्या तीन महिन्यांपासून वैद्यकीय रजेवर होते. रजेचा कालावधी संपल्यानंतर कार्यालयात पुन्हा रुजू होण्यासाठी त्यांना वैद्यकीय मंडळाची शिफारस आणि फिटनेस प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक होते. यासाठी तक्रारदाराला नागपूरच्या मेयो रुग्णालयातील वैद्यकीय मंडळासमोर उपस्थित राहण्यास सांगण्यात आले होते. तक्रारदार वैद्यकीय मंडळापुढे हजर झाले असता, डॉ. जैस्वाल आणि लघुलेखक आशिष मेटेकर यांनी हे प्रमाणपत्र देण्यासाठी सुरुवातीला ३० हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली. तक्रारदाराने या संदर्भात नागपूर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार नोंदवली. या तक्रारीच्या आधारे २४ जून २०२६ रोजी एसीबीच्या पथकाने पडताळणी केली असता, दोन्ही आरोपींनी तडजोडीअंती २० हजार रुपयांची लाच स्वीकारण्याची तयारी दर्शवली. मात्र, त्यानंतर तक्रारदारावर संशय आल्यामुळे त्यांनी प्रत्यक्ष लाचेची रक्कम स्वीकारली नाही. लाचेची मागणी सिद्ध झाल्यामुळे अखेर ३० जून २०२६ रोजी एसीबीने डॉ. जैस्वाल आणि मेटेकर या दोघांनाही ताब्यात घेतले. नागपूर शहर येथील तहसील पोलिस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा नोंदवण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. नागपूर विभागातील शासकीय रुग्णालयांमध्ये एसीबीने कारवाई करण्याची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वी २०१७ मध्ये मेयो रुग्णालयाच्या (आयजीएमसी) तत्कालीन अधिष्ठाता (डीन) डॉ. मीनाक्षी गजभिये यांना औषध पुरवठादाराचे थकीत बिल मंजूर करण्यासाठी १५ हजार रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहात पकडण्यात आले होते. तसेच, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (मेडिकल) येथील नेत्ररोग विभागातही यापूर्वी लाचखोरीप्रकरणी एसीबीने कारवाई केली होती.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *