![]()
इयत्ता चौथीच्या गणित पाठ्यपुस्तकातील काही मुद्रणदोष पुढील आवृत्तीत दुरुस्त करण्यात येणार आहेत. या त्रुटींची दखल घेण्यात आली असून, सुधारित माहिती क्यूआर कोडद्वारे व्हिडिओ स्वरूपात तात्काळ उपलब्ध करून दिली जाईल, अशी माहिती पाठ्यपुस्तक मंडळाने दिली आहे. पुणे येथील पाठ्यपुस्तक मंडळाने प्रसिद्धीपत्रकाद्वारे ही माहिती दिली. चौथीचे गणित पाठ्यपुस्तक एकूण १० माध्यमांमध्ये प्रकाशित झाले आहे. त्यापैकी मराठी आणि इंग्रजी माध्यमांच्या पुस्तकांमध्ये काही मुद्रणदोष निदर्शनास आले आहेत. मराठी आणि इंग्रजी माध्यमांच्या पाठ्यपुस्तकातील पृष्ठ क्रमांक १०९ वर भारतीय गणिततज्ज्ञ श्रीनिवास रामानुजन यांच्या निधनाची तारीख चुकीची छापली गेली आहे. पुस्तकात २७ एप्रिल १९२० अशी तारीख नमूद आहे, तर योग्य तारीख २६ एप्रिल १९२० आहे. हा मुद्रणदोष पुढील आवृत्तीत सुधारला जाईल. मराठी माध्यमाच्या पाठ्यपुस्तकातील पृष्ठ क्रमांक ५५ वरील स्वाध्यायातील प्रश्न क्रमांक १ मधील ‘जोड्या लावा’ या भागात ‘१००० ग्रॅमपेक्षा जास्त’ असे छापले आहे. प्रत्यक्षात ते ‘१००० किलोग्रॅमपेक्षा जास्त’ असे असणे अपेक्षित होते. ही त्रुटी केवळ मराठी माध्यमाच्या पुस्तकात असून तीही पुढील आवृत्तीत दुरुस्त केली जाईल. इंग्रजी माध्यमाच्या पाठ्यपुस्तकातील पृष्ठ क्रमांक ७७ वर खालून चौथ्या ओळीत ‘of’ ऐवजी ‘of ₹1.’ आणि खालून तिसऱ्या ओळीत ‘₹1.49 rupees’ ऐवजी ’49 rupees’ असे असणे अपेक्षित होते. ही चूक केवळ इंग्रजी माध्यमाच्या पुस्तकात असून, पुढील आवृत्तीत आवश्यक ती दुरुस्ती केली जाईल. विद्यार्थी आणि शिक्षकांना योग्य माहिती त्वरित मिळावी यासाठी, संबंधित सुधारित बदलांचा व्हिडिओ पाठ्यपुस्तकातील क्यूआर कोडद्वारे तात्काळ अपलोड करण्यात येणार असल्याचे संबंधित विभागाने कळवले आहे. हे ही वाचा… ‘बालभारती’चा भोंगळ कारभार!:चौथीच्या गणिताच्या नव्या पुस्तकात गंभीर चुका, रामानुजन यांच्या निधनाची तारीखही चुकवली राज्यभरात शाळा सुरू झाल्या असून विद्यार्थ्यांच्या अभ्यासालाही वेग आला आहे. शैक्षणिक वर्ष 2026-27 पासून इयत्ता दुसरी, तिसरी, चौथी आणि सहावीसाठी नवीन अभ्यासक्रम लागू करण्यात आला आहे. मात्र, याच दरम्यान ‘बालभारती’च्या ढिसाळ कारभाराचा एक अत्यंत धक्कादायक प्रकार समोर आला असून, इयत्ता चौथीच्या गणिताच्या नवीन पाठ्यपुस्तकात एक-दोन नव्हे, तर अनेक गंभीर चुका असल्याचे उघडकीस आले आहे. सविस्तर वाचा…
Source link
चौथीच्या गणित पुस्तकात मुद्रणदोष आढळले:पुढील आवृत्तीत दुरुस्त होणार; पाठ्यपुस्तक मंडळाची माहिती