Headlines

एसटी स्थानकात प्रवाशांचे दागिने चोरणाऱ्या 3 महिला जेरबंद:साडेचार लाखांचे सोन्याचे दागिने पुणे पोलिसांकडून जप्त




स्वारगेट एसटी स्थानकावर प्रवाशांचे दागिने चोरणाऱ्या 3 महिलांना अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी त्यांच्याकडून 4 लाख 40 हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने जप्त केले आहेत. या कारवाईमुळे दोन चोरीचे गुन्हे उघडकीस आले आहेत. अटक करण्यात आलेल्या महिलांमध्ये लिलाबाई भोलेनाथ खंदारे (वय 65), चंदाबाई छबू लोंढे (वय 68, दोघी मूळ रा. सलबतपूर, ता. नेवासा, जि. अहिल्यानगर) आणि अश्विनी अविनाश भोसले (वय 27, रा. गणगेवाडी माही जळगाव, ता. कर्जत, जि. अहिल्यानगर) यांचा समावेश आहे. स्वारगेट एसटी स्थानकात एका प्रवासी महिलेकडील दागिने चोरल्याची घटना नुकतीच घडली होती. या प्रकरणाचा तपास करत असताना पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज तपासले. पोलिस कर्मचारी सुजय पवार आणि सागर केकाण यांनी चोरट्या महिलांचा शोध सुरू केला. तपासात, दागिने चोरणाऱ्या महिला अहिल्यानगर जिल्ह्यातील सलबतपूरच्या रहिवासी असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर, पोलिसांच्या पथकाने लिलाबाई खंदारे आणि चंदाबाई लोंढे यांना सलबतपूर येथून ताब्यात घेतले. त्यांच्याकडून 1 लाख 40 हजार रुपये किमतीचे एक तोळ्याचे मंगळसूत्र जप्त करण्यात आले. एसटी स्थानकाच्या आवारात आणखी एका प्रवासी महिलेकडील दागिने चोरीची घटना घडली होती. या गुन्ह्याचा तपास करताना, पोलिस कर्मचारी सागर काळे आणि हर्षल शिंदे यांनी सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे अश्विनी भोसले हिची माहिती मिळवली. त्यानंतर तिला कर्जत तालुक्यातील तिच्या मूळगावातून ताब्यात घेण्यात आले. या कारवाईमुळे एसटी स्थानकातील दागिने चोरीचे दोन गुन्हे उघडकीस आले असून, एकूण 4 लाख 40 हजार रुपयांचे सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले आहेत. पोलिस उपायुक्त मिलिंद मोहिते आणि सहायक आयुक्त राहुल आवारे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलिस निरीक्षक यशवंत निकम, गुन्हे शाखेचे निरीक्षक विकास भारमळ, प्रदीपसिंग सिसोदे, उपनिरीक्षक बाळू शिरसट, अश्रृबा मोराळे, नाना भांदुर्गे, सागर केकाण, प्रशांत टोणपे, सुजय पवार, हर्षल शिंदे, सागर काळे, हनुमंत दुधे, संग्राम केंद्रे, रमेश चव्हाण, सुवर्णा सांगोलकर आणि अनिता घायतडक यांच्या पथकाने ही कामगिरी केली.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *