![]()
कळमनुरी विधानसभा मतदारसंघात विशेष संक्षिप्त पुनरीक्षण (एसआयआर) सर्वेक्षणाची प्रक्रिया वेगाने सुरू असून प्रशासनाने मतदार यादी अधिक अचूक, अद्ययावत आणि पारदर्शक करण्यासाठी विशेष मोहीम हाती घेण्यात आली असून ९३ टक्के मतदारांचे मॅपींगचे काम पूर्ण झाले आहे. ३४५ मतदान केंद्रासाठी ३४५ केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आल्याची माहिती उपविभागीय अधिखारी प्रतिक्षा भुते यांनी दिली आहे. 93 टक्के मतदारांचे मॅपिंग पूर्ण कळमनुरी विधानसभा मतदारसंघात एकूण ३ लाख २४ हजार मतदार नोंदणीकृत आहेत. यापैकी तब्बल ९३ टक्के म्हणजेच सुमारे २ लाख ९४ हजार मतदारांचे मॅपिंगचे काम पूर्ण झाले आहे. उर्वरित सुमारे ३० हजार मतदारांचे मॅपिंग येत्या काही दिवसांत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट प्रशासनाने निश्चित केले आहे. 345 केंद्रावर बिएलओंची नियुक्ती मतदारसंघातील एकूण ३४५ मतदान केंद्रांसाठी बीएलओ (बूथ लेव्हल ऑफिसर) कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली असून प्रत्येक कर्मचाऱ्याला त्यांच्या कार्यक्षेत्रातील मतदारांची प्रत्यक्ष भेट घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. घराघरात जाऊन मतदारांची माहिती अद्ययावत करणे, आवश्यक कागदपत्रांची पडताळणी करणे आणि अर्जांचे वितरण करणे ही जबाबदारी बीएलओंकडे सोपविण्यात आली आहे. या प्रक्रियेवर तहसीलदार जीवककुमार कांबळे यांचे लक्ष असणार आहे. या विशेष मोहिमेअंतर्गत बीएलओ कर्मचारी पुढील पाच दिवस मतदारांच्या घरी भेटी देऊन आवश्यक अर्जांचे वितरण करणार आहेत. त्यानंतर पुढील पाच दिवसांच्या कालावधीत संबंधित मतदारांनी अर्ज भरून आवश्यक कागदपत्रांसह बीएलओंकडे जमा करणे अपेक्षित आहे. अर्जासोबत पासपोर्ट आकाराचा फोटो, ओळखपत्र तसेच निवडणूक आयोगाने निर्धारित केलेली अन्य कागदपत्रे सादर करणे आवश्यक राहणार असल्याचे भुते यांनी सांगितले. मतदार यादीतील नावे, पत्ते, कौटुंबिक माहिती आणि इतर तपशील अचूक राहावेत यासाठी ही प्रक्रिया महत्त्वाची असून कोणत्याही प्रकारच्या तांत्रिक अडचणी निर्माण होऊ नयेत, यासाठी प्रशासन विशेष दक्षता घेत आहे. बीएलओ कर्मचारी आपल्या घरी भेट देतील तेव्हा त्यांना आवश्यक ती माहिती, कागदपत्रे आणि सहकार्य करण्याचे आवाहन उपविभागीय अधिकारी प्रतिक्षा भुते यांनी केले आहे.
Source link
हिंगोलीच्या कळमनुरीत SIR सर्वेक्षणाला वेग:93 टक्के मतदारांचे मॅपिंग पूर्ण, 345 केंद्रावर बिएलओंची नियुक्ती