मुंबईतील चेंबूर परिसरात एका स्कूल बसवर मोठे झाड कोसळून झालेल्या दुर्दैवी घटनेवरून शिवसेना (UBT) नेते आदित्य ठाकरे यांनी मुंबई महानगरपालिका (BMC) आणि राज्य सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. या दुर्घटनेवर विचारण्यात आलेल्या प्रश्नाला उत्तर देताना त्यां
.
चेंबूर दुर्घटना आणि काँक्रिटीकरणाचा घोटाळा
चेंबूरमध्ये स्कूल बसवर झाड पडल्याच्या घटनेवर तीव्र संताप व्यक्त करत आदित्य ठाकरे म्हणाले, “काल चेंबूरमध्ये घडलेली घटना अत्यंत दुर्दैवी आहे. गेल्या दीड वर्षांत आपण मेट्रोचा स्लॅब कोसळून मृत्यू होणे, खड्ड्यात पडून जीव जाणे, अशा अनेक घटना पाहत आहोत. गेले चार वर्षे आम्ही सातत्याने ओरडून सांगत आहोत की, रस्त्यांची कामे बोगस कॉन्ट्रॅक्टरांनी आणि घोटाळेबाजांनी केली आहेत. झाडांच्या मुळाभोवती तुम्ही पूर्णपणे काँक्रिटीकरण केल्यामुळे झाडांना श्वास घ्यायला जागाच उरलेली नाही. मुळांना काँक्रिटचा विळखा पडल्याने झाडे नाजूक झाली आहेत आणि त्यामुळेच अशा दुर्घटना घडत आहेत. हा ‘बेसिक कॉमन सेन्स’ आत्ताच्या शासनामध्ये उरलेला नाही.”
“महापौरांचे लक्ष मुंबईपेक्षा बांगलादेशात जास्त!”
पावसाळ्यापूर्वी नालेसफाई आणि झाडांच्या फांद्या छाटण्याची जबाबदारी पालिकेची असते, मात्र त्यात प्रशासन सपशेल अपयशी ठरल्याचा आरोप त्यांनी केला. “मुंबईत पावसाळ्यामुळे अशा दुर्घटना घडत आहेत, अनेक बळी जात आहेत. पण अनेक वर्षांनंतर बीएमसीमध्ये असे शासन बसले आहे ज्यांना मुंबईची अजिबात चिंता नाही. मुंबईच्या महापौरांचे लक्ष मुंबईच्या कामाकडे अजिबात नसून, शेजारील बांगलादेशच्या ढाक्यामध्ये काय चालले आहे, याकडेच जास्त आहे,” असा घणाघात आदित्य ठाकरे यांनी केला.
सचिन अहिरांच्या पक्षप्रवेशावर टीका
सचिन अहिर यांच्या शिंदे गटातील प्रवेशावर थेट बोलणे टाळत आदित्य ठाकरे म्हणाले, “लढो अथवा न लढो, आमचा आमच्या कामावर, आमच्या पक्षावर आणि जनतेवर विश्वास आहे. सचिन अहिर यांनी मला काल जो मेसेज केला, तो थोडा वेगळा होता. पण ज्यांना शिवसेना उपनेतेपद दिले, युनियनचे अध्यक्षपद दिले, त्यांना आणखी काय हवे होते?” ते पुढे म्हणाले, “वरळीत आता त्यांच्याविरुद्ध कोण लढणार, हे जनता ठरवेल. आमचे काम आहे आणि आमचे काम बोलते.”
हिंदुत्वविरोधीच भाजप-शिंदेंसोबत जाऊ शकतात!
भाजप आणि शिंदे गटावर निशाणा साधताना आदित्य ठाकरे यांनी अयोध्येतील राम मंदिर आणि उज्जैनमधील महाकाल कॉरिडॉरच्या मुद्द्यावरून गंभीर आरोप केले. “जे आमदार किंवा खासदार आज मिंध्यांसोबत (एकनाथ शिंदे) किंवा भाजपसोबत जात आहेत, त्यांनी जनतेला फक्त एवढं उत्तर द्यावं की, जे अयोध्या लुटत आहेत, जे उज्जैनची भूमी लुटत आहेत, तुम्ही त्यांच्या मांडीला मांडी लावून कसे बसू शकता? ज्यांना भाजपची ही अयोध्येची लूट आणि उज्जैनची लूट मान्य आहे, तेच त्यांच्यासोबत जाऊ शकतात. जे हिंदुत्वाच्या विरोधात आहेत, तेच आज भाजप आणि शिंदेंसोबत जात आहेत,” असा घणाघात आदित्य ठाकरे यांनी केला.
‘ऑपरेशन देवेंद्र’ राज्यासाठी नव्हे, देशासाठी धोकादायक
राज्यात सुरू असलेल्या आमदार-खासदार फोडाफोडीच्या राजकारणावर संताप व्यक्त करत आदित्य ठाकरे यांनी याला ‘ऑपरेशन देवेंद्र’ असे नाव दिले. “हे ‘ऑपरेशन देवेंद्र’ महाराष्ट्रालाच काय, पण देशाला खूप धोकादायक आहे. नागरिक म्हणून विचार करा, पक्षांची तोडफोड करणे, पैसे देऊन आमदार विकत घेणे, हा जो निर्लज्जपणा आणि चोरी चालली आहे, त्याला काही पातळी उरली आहे की नाही? देशाची आणि राज्याची आर्थिक स्थिती काय आहे, नोकऱ्या आहेत की नाहीत, यावर सरकारचे अजिबात लक्ष नाही. नुसता हंगामा करायचा, आमदार विकत घ्यायचे आणि पक्ष फोडायचे, हे घाणेरडे राजकारण सुरू आहे,” असे ते म्हणाले.
जुनियर, सीनियर आणि सुपर सीनियर गद्दार!
शिंदे गटातील अंतर्गत परिस्थितीवर उपहासात्मक टीका करताना ते म्हणाले, “मिंध्यांच्या टोळीत आता ‘कॅटेगरीज’ झाल्या आहेत— जुनियर गद्दार, सीनियर गद्दार आणि सुपर सीनियर गद्दार. जे मिंध्यांच्या टोळीत पळून गेले होते, ते आता विचारत आहेत की आम्हाला कधी काय मिळणार? पण माझा सवाल भाजप आणि संघाच्या कार्यकर्त्यांना आहे की, ज्यांनी आपले पूर्ण जीवन भाजपला अर्पित केले, ते लोक सत्तेत असताना या पदांवर कधी बसणार?”
संबंधित बातम्या वाचा…
झाड पडणार हे आधी कसं कळणार?:चेंबूर दुर्घटनेनंतर मंत्री संजय शिरसाटांच्या वक्तव्यावरून नवा वाद, विरोधक आक्रमक

चेंबूरमध्ये शाळेच्या बसवर मोठे झाड कोसळून 11 वर्षीय विद्यार्थ्याचा मृत्यू झाल्याच्या दुर्दैवी घटनेनंतर राज्याचे सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी केलेल्या वक्तव्यावरून नवा वाद निर्माण झाला आहे. “झाड पडणे किंवा वीज पडणे या गोष्टी माणसाच्या हातात नसतात. कोणते झाड कधी पडणार हे आधी कसे कळणार?” असे शिरसाट यांनी म्हटले. त्यांच्या या वक्तव्यावर विरोधकांनी तीव्र नाराजी व्यक्त करत सरकारवर असंवेदनशीलतेचा आरोप केला आहे. येथे वाचा संपूर्ण बातमी
चेंबूरमध्ये मोठी दुर्घटना!:स्कूल बसवर मोठे झाड उन्मळून पडले, 4 विद्यार्थी जखमी; 11 वर्षीय विद्यार्थ्याचा उपचारादरम्यान मृत्यू

मुंबईतील चेंबूर परिसरात आज दुपारी एक अत्यंत भीषण आणि धक्कादायक दुर्घटना घडली आहे. येथील ११ नंबर रोडवर शाळा सुटल्यानंतर विद्यार्थ्यांना घेऊन जाणाऱ्या एका खाजगी स्कूल बसवर रस्त्याच्या कडेला असलेले एक अवाढव्य झाड अचानक उन्मळून कोसळले. या दुर्दैवी अपघातात एका विद्यार्थ्याचा मृत्यू झाला असून, ४ शाळकरी मुले गंभीर जखमी झाली आहेत. येथे वाचा संपूर्ण बातमी