![]()
‘डॉक्टर डे’चे औचित्य साधून इंडियन मेडिकल असोसिएशन (आयएमए), अहिल्यानगर शाखेच्या वतीने गांधी मैदान येथील अनामप्रेम संस्थेत सर्वरोग निदान व आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. संस्थेतील मुला-मुलींची आरोग्य तपासणी करून डॉक्टरांनी त्यांच्यासोबत हा दिवस उत्साहात साजरा केला. यावेळी डॉक्टरांनी मुलांशी संवाद साधत त्यांना आरोग्यविषयक मार्गदर्शन केले. शिबिरात आयएमएचे अध्यक्ष डॉ. धनंजय कुलकर्णी, सचिव डॉ. अमित करडे, माजी अध्यक्ष डॉ. चंद्रवदन मिश्रा, डॉ. मिलिंद पोळ, डॉ. नरेंद्र वानखडे, डॉ. सचिन पांडुळे, डॉ. प्राजक्ता पारधे, डॉ. अतुल खालकर, डॉ. अविनाश गाडेकर, डॉ. महेश घोडके, डॉ. रोहित थोरात, डॉ. कस्तुरी कुऱ्हाडे, डॉ. क्षितिज तांबोळी, डॉ. अर्चना सिंग तांबोळी, डॉ. अनिलकुमार सिंग, डॉ. सत्त्व दराडे, अनामप्रेमच्या डॉ. मराठे मॅडम आणि व्यवस्थापक विशाल येमुल उपस्थित होते. “आयएमएच्या वतीने दरवर्षी हा दिवस समाजोपयोगी उपक्रमातून साजरा केला जातो. अनामप्रेममधील वंचित घटकांना समाजाच्या आधाराची गरज आहे. येथील मुलांनी टाकाऊ वस्तूंमधून तयार केलेल्या आकर्षक कलाकृती त्यांच्या जिद्दीचे प्रतीक आहेत. या वस्तूंची खरेदी करून त्यांच्या कष्टाला योग्य मोबदला देणे ही समाजाची जबाबदारी असून, भविष्यात आयएमएच्या कार्यक्रमांमध्ये ही उत्पादने खरेदी करून त्यांना प्रोत्साहन दिले जाईल, असे डॉ. कुलकर्णी म्हणाले. ज्येष्ठ तज्ज्ञ डॉ. नरेंद्र वानखेडे म्हणाले, गेल्या चार-पाच वर्षांपासून आयएमए अनामप्रेम संस्थेत हा उपक्रम राबवून मुलांवर मोफत औषधोपचार करत असून, संघटना नेहमीच तळागाळातील घटकांच्या पाठीशी उभी राहील. अनामप्रेम संस्थेतील मुला-मुलींनी टाकाऊ वस्तूंमधून तयार केलेल्या आकर्षक कलाकृती पाहून उपस्थित डॉक्टर भारावून गेले. अत्यंत कठीण परिस्थितीतही चेहऱ्यावर आनंद ठेवत स्वावलंबनाचा मार्ग स्वीकारणाऱ्या या मुलांचा आदर्श समाजाने घेतला पाहिजे. त्यांनी बनवलेल्या हस्तकलेच्या वस्तू खरेदी करून त्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप द्यावी, असे आवाहन आयएमएच्या वतीने करण्यात आले.
Source link
"डॉक्टर डे'' निमित्तसामाजिक बांधिलकी:"आयएमए'च्या डॉक्टरांनी अनामप्रेम संस्थेतील मुलांची केली मोफत तपासणी