खासदार अमोल कोल्हे यांनी ‘ऑफर आल्यास विचार करू’ असे केलेले सूचक विधान आणि त्यापाठोपाठ रोहित पवार यांनी ‘कुणीही कुठेही जाणार नाही’ असे केलेले स्पष्टीकरण, यावरून शिवसेना नेते आणि आमदार संजय शिरसाट यांनी राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षावर जोरद
.
अमोल कोल्हेंच्या विधानावर शिरसाट काय म्हणाले?
अमोल कोल्हेंच्या विधानावर बोलताना संजय शिरसाट म्हणाले, “अमोल कोल्हे हे शरद पवार गटाचे नेते आणि प्रवक्ते आहेत. त्यांनी जर असे विधान केले असेल, तर त्यांना पक्षाच्या नेतृत्वानेच तसे सांगायला लावले असावे. त्यांच्या या विधानाला नक्कीच एक ‘बेस’ आहे. त्यांच्या पक्षामध्ये आता ऑफर आली तर युतीत जायचं, हे जवळपास ठरलेलं दिसतंय. राष्ट्रवादी काँग्रेसचे काँग्रेसमध्ये विलीनीकरण होण्याच्या चर्चाही अशाच सुरू नाहीत.”
रोहित पवारांवर निशाणा
रोहित पवारांच्या दाव्याची खिल्ली उडवत शिरसाट म्हणाले, “राष्ट्रवादीचे धोरण नेहमीच उलटे राहिले आहे. त्यांना जर दिल्लीला जायचे असेल तर ते म्हणतात ‘मी परभणीला चाललो’. रोहित पवार हे आता याच धोरणानुसार वागत आहेत. ‘नाही म्हणायचं आणि ऐन वेळेला जायचं’ हे त्यांचं ठरलेलं आहे. त्यामुळे परिवर्तनाची नांदी आणि बदलाचे वारे आता तिथे वाहू लागले आहेत. पक्षात शरद पवारांशिवाय असा कोणताही धुरंधर नेता उरला नाही, ज्याच्या खांद्यावर मान टाकता येईल.”
‘तुकाराम मुंढेंनी भ्रष्ट अधिकाऱ्यांवरही कारवाई करावी’
अन्न आणि औषध प्रशासनाकडून (FDA) छत्रपती संभाजीनगरसह राज्यभरात हॉटेल्स, डेअरी आणि मिठाईच्या दुकानांवर सुरू असलेल्या कारवाईचे शिरसाट यांनी स्वागत केले. ते म्हणाले, “तुकाराम मुंढे या एका अधिकाऱ्याने आल्यावर एवढ्या सर्व गोष्टी उजेडात आणल्या, हे खरोखर अभिनंदनीय आहे. पूर्वी याच विभागातले अधिकारी हप्ते वसुली आणि भ्रष्टाचार करून या गोरखधंद्यांना अभय देत होते. आता या कारवाईमुळे व्यापाऱ्यांमध्ये धास्ती बसली आहे. तुकाराम मुंढे यांनी हॉटेल चालकांसोबतच यापूर्वी ज्या अधिकाऱ्यांनी हप्ते खाल्ले, त्यांच्यावरही कठोर कारवाई करावी.”
‘छत्रपती संभाजीनगर अतिरेक्यांचा अड्डा बनत चाललाय’
राजस्थान पोलिसांनी (ATS) छत्रपती संभाजीनगरमधून ‘ISI’ शी संबंधित एका संशयिताला ताब्यात घेतल्याच्या घटनेवर शिरसाट यांनी तीव्र चिंता व्यक्त केली. “जेव्हा लालकृष्ण अडवाणी गृहमंत्री होते, तेव्हाच या शहराला ‘सेन्सिटिव्ह’ घोषित करण्यात आले होते. इथे एटीएसने अतिरेक्यांना मारलेही होते. आता परत या कारवाईमुळे छत्रपती संभाजीनगर अतिरेक्यांचा अड्डा बनत चाललाय की काय, अशी रास्त शंका निर्माण झाली आहे. पाकिस्तान आणि काश्मीरमधील अतिरेक्यांशी डायरेक्ट कनेक्शन असणारे काही लोक इथे आहेत. याच माध्यमातून शहरात ड्रग्जचा व्यवसायही चालतो. पोलिसांनी आणि सरकारने आता डोळ्यात तेल घालून इथे ‘सर्च ऑपरेशन’ राबवण्याची गरज आहे,” अशी मागणी त्यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली.
पाणीपुरवठा योजनेवर बोलताना ते म्हणाले की, संभाजीनगरच्या महत्त्वाकांक्षी पाणीपुरवठा योजनेत हलगर्जीपणा करणाऱ्या आणि विलंब लावणाऱ्या कंत्राटदार व अधिकाऱ्यांवर कडक कारवाई करण्याची मागणी आपण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मंत्री गुलाबराव पाटील यांच्याकडे केली असून, लवकरच चौकशी सुरू होईल, असे त्यांनी सांगितले.
राज ठाकरे यांनी भाजपवर केलेल्या टीकेवर बोलताना शिरसाट म्हणाले, “भाजपमध्ये मोदी पंतप्रधान होणार की अमित शाह, या त्यांच्या अंतर्गत भांडणातून तुम्हाला काय मिळणार? स्वतःच्या पक्षात ना खासदार आहे ना आमदार, तरीही दुसऱ्याच्या घरात डोकावून पाहणे योग्य नाही. खासदार फुटल्यानंतर उद्धव ठाकरे त्या मतदारसंघांमध्ये जाऊन शिवसैनिकांना थांबण्याची विनंती करत आहेत, ही त्यांची हतबलता आहे. त्यामुळे जे शिवसैनिक संभ्रमात होते, तेही आता एकनाथ शिंदेंकडे येऊ लागले आहेत,” असा दावा शिरसाट यांनी केला.
संबंधित बातमी वाचा
माझ्या वक्तव्याचा विपर्यास केला!:’ऑफर’च्या विधानामागची ‘ही’ होती! इनसाइड स्टोरी; खासदार अमोल कोल्हेंचा पत्रकार परिषदेत खुलासा

पुणे-नाशिक रेल्वे प्रकल्पाच्या संदर्भातील वक्तव्यावरून राजकीय वर्तुळात सुरू असलेल्या जोरदार चर्चांवर अखेर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी पडदा टाकला आहे. आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी आपल्या कालच्या “ऑफर आली तर भविष्यात विचार करेन” या विधानाचा चुकीचा अर्थ काढला गेल्याचे सांगत संपूर्ण प्रसंग स्पष्ट केला. “आदरणीय शरद पवार साहेब सांगतील तेच आमचे धोरण आहे,” असे सांगत त्यांनी आपण पक्षातच राहणार असल्याचे पुन्हा एकदा ठामपणे स्पष्ट केले. येथे वाचा संपूर्ण बातमी