Headlines

पहिल्याच पावसात अर्धवट उघड्या गटारांमुळे रस्त्यांवर घाणीचे साम्राज्य:पावसाळापूर्व कामांची गुणवत्ता चव्हाट्यावर, आरोग्य धोक्यात




शहरात शुक्रवारी मान्सूनच्या पहिल्याच मोठ्या पावसाने जोरदार हजेरी लावली. सुमारे ४ ते ५ तास चाललेल्या या संततधार पावसामुळे नागरिकांना उकाड्यापासून मोठा दिलासा मिळाला असला, तरी महापालिकेच्या पावसाळापूर्व कामांची पुरती पोलखोल झाली आहे. पहिल्याच पावसाने शहराची दैना उडवली असून प्रशासनाचा गलथान कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. पावसाचा जोर वाढताच शहरातील अनेक भागांतील गटारांची अर्धवट उघडी झाकणे आणि तुंबलेली ड्रेनेज लाईन यांमुळे गटारांमधील दूषित पाणी थेट रस्त्यावर आले. हे मैलायुक्त पाणी पावसाच्या पाण्यात मिसळल्याने रस्त्यांना नाल्याचे स्वरूप आले होते. पाऊस ओसरल्यानंतरही हे पाणी रस्त्यावर साचून राहिल्याने संपूर्ण परिसरात प्रचंड दुर्गंधी पसरली. विशेषतः शहरातील मुख्य बाजारपेठ आणि गजबजलेला भाग असलेल्या चितळे रस्ता, तेलीखुंट परिसर, तसेच दिल्लीगेट ते जुना कोर्टाचा रस्ता या भागांत परिस्थिती अत्यंत बिकट झाली होती. या रस्त्यांवरून पादचाऱ्यांना आणि वाहनचालकांना प्रचंड कसरत करावी लागली. दरवर्षी पावसाळ्यापूर्वी नालेसफाई केल्याचे दावे करणाऱ्या मनपा प्रशासनाच्या ढिसाळ नियोजनामुळे नागरिकांना पहिल्याच दिवशी यातना सहन कराव्या लागल्या. भविष्यात मोठा पाऊस झाल्यास शहराची स्थिती काय होईल, या भीतीने नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. प्रशासनाने तात्काळ दखल घेऊन ही अर्धवट उघडी झाकणे दुरुस्त करावीत, अशी मागणी आता नगरकरांमधून जोर धरू लागली आहे. गटारांचे दूषित पाणी रस्त्यांवर पसरल्याने परिसरात डासांचा प्रादुर्भाव वाढून डेंग्यू आणि मलेरियाचा धोका निर्माण झाला आहे. तसेच, या दूषित पाण्याच्या संपर्कात आल्यामुळे त्वचेचे विकार, गॅस्ट्रो आणि काविळीसारख्या जलजन्य आजारांची साथ पसरण्याची भीती निर्माण झाली आहे. नागरिकांना दिवसभर मनस्ताप रस्त्यांवर साचलेल्या ड्रेनेजच्या दुर्गंधीयुक्त पाण्यामुळे पादचाऱ्यांना चालणे असह्य झाले होते. अनेक दुकानांमध्ये हे पाणी शिरल्याने व्यापाऱ्यांचे मोठे नुकसान झाले. वाहनचालक घसरून पडल्याने वाहतूक कोंडी झाली आणि नागरिकांना दिवसभर प्रचंड मनस्ताप सहन करावा लागला.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *