![]()
पुणे शहरात गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे जनजीवनावर परिणाम झाला आहे. मुळा-मुठा नद्यांच्या पाणीपातळीत वाढ झाली असून, या पार्श्वभूमीवर पुणे महानगरपालिकेच्या महापौर मंजुषा नागपुरे यांनी महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन कक्षाला भेट देऊन सद्यस्थितीचा सविस्तर आढावा घेतला. यावेळी महापौरांनी शहरातील विविध भागांतील पर्जन्यमान, पाणी साचलेल्या ठिकाणांची स्थिती, मुळा-मुठा नदीपात्रांतील पाणीपातळीची माहिती घेतली. तसेच, आपत्कालीन परिस्थिती हाताळण्यासाठी कार्यरत असलेल्या यंत्रणेची तयारी आणि नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी राबविण्यात येत असलेल्या उपाययोजनांबाबत संबंधित अधिकाऱ्यांकडून माहिती जाणून घेतली. महापौर नागपुरे यांनी आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा अधिक गतिमान, समन्वयपूर्ण आणि परिणामकारक पद्धतीने कार्यरत ठेवण्याच्या सूचना दिल्या. संभाव्य आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास तातडीने प्रतिसाद देण्याचे निर्देश त्यांनी संबंधित विभागांना दिले. पूरप्रवण क्षेत्रे, नदीकाठचा परिसर, पाणी साचणारे भाग तसेच वाहतूक व्यवस्थेवर सातत्याने लक्ष ठेवण्याचे आदेश देण्यात आले. सर्व संबंधित विभागांनी परस्पर समन्वयातून आवश्यक कार्यवाही करावी, असेही महापौरांनी स्पष्ट केले. हवामान विभागाकडून प्राप्त होणाऱ्या इशाऱ्यांनुसार परिस्थितीवर सातत्याने लक्ष ठेवणे, आवश्यक मनुष्यबळ, यंत्रसामग्री व संसाधने उपलब्ध ठेवणे, तसेच नागरिकांना वेळोवेळी अधिकृत माहिती उपलब्ध करून देण्याबाबतही त्यांनी अधिकाऱ्यांना सूचना दिल्या. पुणे महानगरपालिकेची आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा परिस्थितीवर सातत्याने लक्ष ठेवून कार्यरत आहे. नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने आवश्यक त्या सर्व प्रतिबंधात्मक व तातडीच्या उपाययोजना करण्यात येत असल्याची माहिती यावेळी देण्यात आली. महापौर मंजुषा नागपुरे यांनी नागरिकांना आवाहन केले की, संततधार पावसाच्या पार्श्वभूमीवर कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता केवळ प्रशासनाकडून जारी करण्यात येणाऱ्या अधिकृत सूचनांचे पालन करावे. नदीकाठच्या परिसरात आणि पाणी साचलेल्या ठिकाणी अनावश्यक वावर टाळावा. कोणतीही आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास तात्काळ पुणे महानगरपालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन कक्षाशी संपर्क साधून प्रशासनाला सहकार्य करावे, असेही त्यांनी सांगितले. आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांच्या सोयीसाठी महत्त्वाचे संपर्क क्रमांक जारी करण्यात आले आहेत: पोलीस: १०० / ११२, रुग्णवाहिका: १०२ / १०८, अग्निशमन विभाग: १०१, जिल्हा आपत्ती नियंत्रण कक्ष, पुणे: १०७७ / ०२०-२६१२३३७१, पुणे महानगरपालिका आपत्ती व्यवस्थापन विभाग: ०२०-२५५०१२६९ / ०२०-२५५०६८००.
Source link
पुणे महापौर नागपुरे यांनी घेतला आपत्ती व्यवस्थापन कक्षाचा आढावा:नागरिकांनी आपत्कालीन स्थितीत संपर्क साधण्याचे आवाहन