Headlines

पिंपळदरी परिसरासह अद्रक लागवडीकडे कल:लागवडीसाठी 5,500 रुपये प्रतिक्विंटल दराने बियाण्याची खरेदी‎




सिल्लोड तालुक्यातील पिंपळदरी, अजिंठा, अनाड, बाळापूर, गोळेगाव, धोत्रा, पानवडोद, शिवणा, पानस, डिग्रस, सराटी, बोदवड, लिहाखेडी, खंडाळा, वसई व जळकी परिसरातील शेतकऱ्यांनी यंदा पारंपरिक पिकांना फाटा दिला आहे. शेतीचा वाढता उत्पादन खर्च लक्षात घेता, अधिक नफा मिळविण्याच्या उद्देशाने आणि शेतीला आर्थिक स्थैर्य मिळावे या आशेने परिसरातील शेतकरी मिरची व अद्रक या नगदी पिकांच्या लागवडीकडे वळले आहेत. गतवर्षीच्या तुलनेत यंदा अद्रकीला बऱ्यापैकी दर मिळाल्याने शेतकरी सकारात्मक झाले आहेत. सध्या शेतकरी अद्रक लागवडीसाठी ४,८०० ते ५,५०० रुपये प्रति क्विंटल दराने बियाणे खरेदी करत आहेत. मागील वर्षी हंगामाच्या सुरुवातीला अद्रकचे दर २,५०० ते ३,७०० रुपये प्रतिक्विंटल राहिल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला होता. काही वर्षांपूर्वी आले पिकावर लाखो रुपये खर्च करून केवळ ५० ते ६० हजार रुपयेच हातात येत होते, तर मागील वर्षी अनेक शेतकऱ्यांनी चांगले पैसे कमावले. यावर्षी जुने आले उत्पादक शेतकरी आपले बेणे विकून झालेला खर्च वसूल करत आहेत. बाजारात चढ-उतार असले, तरी दरवर्षी आले लावणारा एक निश्चित शेतकरी वर्ग तालुक्यात तयार झाला आहे. मागील वर्षी हिरवी मिरची ४,००० हेक्टर तर २,००० हेक्टर अद्रक पीक होते. यंदा मात्र, मिरची १० हजार तर अद्रक ७ हजार हेक्टरवर लागवड होत आहे. शेतकरी यावर्षी महागडे बेणे खरेदी करून मोठ्या प्रमाणावर अद्रक लागवड करत आहेत. यंदा बाजारपेठेत चांगला भाव मिळेल, अशी आशा असल्याचे शेतकरी विष्णू दौड यांनी सांगितले. कृषी विभागाचा सल्ला, आधुनिक पद्धतींचा वापर अद्रक पिकाला वर्षभर बाजारपेठेत चांगली मागणी असल्याने योग्य दर मिळण्याची आशा आहे. योग्य निचऱ्याची जमीन, दर्जेदार बियाणे, सेंद्रिय खतांचा वापर, ठिबक सिंचन आणि आधुनिक शेती पद्धतीचा अवलंब केल्यास अद्रकचे चांगले उत्पादन मिळते. कंदकुज, बुरशीजन्य रोग व किडींचेनियंत्रण करणे आवश्यक असल्याचे कृषी विभागाने सांगितले.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *