![]()
संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज पालखी सोहळ्याचे (मोठी दिंडी) मंगळवारी लोणीत भक्तिमय आणि अभूतपूर्व उत्साहात आगमन झाले. ६५ दिंड्या आणि तब्बल ५० हजार वारकऱ्यांचा समावेश असलेला हा भव्य सोहळा सहकार पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या लोणी बुद्रूक (ता. राहाता) येथे दाखल होताच संपूर्ण परिसर विठ्ठल नामाच्या गजराने दुमदुमून गेला. टाळ-मृदंगाचा कडकडाट आणि भगव्या पताक्यांनी आसमंत उजळून निघाला होता. त्र्यंबकेश्वरहून पंढरपूरकडे प्रस्थान केलेल्या या सोहळ्याचे सोमवारी गोगलगाव येथे आगमन झाले होते. जिथे डॉ. सुजय विखे पाटील आणि खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांनी स्वागत केले. त्यानंतर मंगळवारी लोणीत पालखीचे आगमन होता ही ज्येष्ठ नेते माजी मंत्री अण्णासाहेब म्हस्के यांच्या हस्ते पालखीचे पूजन व जंगी स्वागत करण्यात आले. पालखी प्रमुख माधवदास महाराज राठी म्हणाले, पालखी सोहळा सुरू झाल्यापासून वरुणराजानेही हजेरी लावल्याने वारकऱ्यांसह बळीराजाला मोठा दिलासा मिळाला आहे. अहिल्यानगर जिल्ह्यात पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी मागील तीन वर्षांपासून वारकऱ्यांसाठी सुरू केलेली व्हीआयपी सुविधांची प्रथा यंदाही चोख ठेवण्यात आली आहे. सोमवारी पावसामुळे निर्माण झालेल्या अडचणींवर डॉ. सुजय विखे पाटील यांनी तातडीने उपाययोजना करून वारकऱ्यांची सोय केली. जिल्हा प्रशासनाने चोख आरोग्य सेवेसोबतच यंदा मंत्री विखे पाटील यांच्या पुढाकाराने वारकऱ्यांसाठी ‘वारकरी चरण सेवा’ (पायांची मालिश, मलमपट्टी व विशेष उपचार) हा अनोखा उपक्रम सुरू केला आहे. मैलोन्मैल चालणाऱ्या वारकऱ्यांच्या चरणांची सेवा करणाऱ्या या उपक्रमाचे सोहळ्यातील संत-महंतांनी व ५० हजार भाविकांनी कौतुक केले. लोणी ग्रामस्थांच्या वतीने सर्व वारकऱ्यांसाठी भव्य महाप्रसादाचेही आयोजन करण्यात आले होते. संत निवृत्तीनाथ पालखी सोहळा मंगळवारी सहकार पंढरी असलेल्या लोणी दाखल झाला. यंदा “वारकरी चरण सेवा’ ठरतेय मुख्य आकर्षण!
Source link
50 हजार वारकऱ्यांसह निवृत्तीनाथांची दिंडी लोणीत:ज्ञानोबा-तुकाराम,पांडुरंग हरीच्या जयघोषाने सहकार पंढरी दुमदुमली