Headlines

पुण्यात 8 ते 11 जुलैदरम्यान जड वाहनांना प्रवेशबंदी:पालखी सोहळ्यानिमित्त जुना मुंबई-पुणे महामार्ग 9 जुलैला बंद




संत श्री ज्ञानेश्वर महाराज आणि संत श्री तुकाराम महाराज यांच्या पालख्या ९ जुलै रोजी पुणे शहरात एकत्र येत आहेत. या पालखी सोहळ्यात मोठ्या संख्येने वारकरी सहभागी होणार असल्याने, वाहतूक कोंडी टाळण्यासाठी पुणे शहर वाहतूक शाखेने विशेष वाहतूक व्यवस्थापन लागू केले आहे. वाहतूक सुरक्षित आणि सुरळीत ठेवणे हा यामागचा उद्देश आहे. पोलीस उपआयुक्त (वाहतूक) डॉ. संदीप भाजीभाकरे यांनी मोटार वाहन कायद्यातील अधिकारांचा वापर करत, अत्यावश्यक सेवेतील वाहने वगळता, ८ जुलैच्या मध्यरात्रीपासून ११ जुलैच्या मध्यरात्रीपर्यंत पुणे शहरात जड-अवजड वाहनांच्या प्रवेशावर बंदी घातली आहे. यामध्ये डंपर, मिक्सर आणि इतर संथगती वाहनांचा समावेश आहे. या कालावधीत शहरांतर्गत जड वाहतुकीलाही मनाई असेल. ही प्रवेशबंदी बोपोडी चौक, भुमकर चौक, कात्रज चौक, राजीव गांधी पूल (औंध), ब्रेमेन चौक, राधा चौक (बाणेर), सुस रोड, चांदणी चौक, वारजे जंक्शन, वडगाव पूल, मंतरवाडी फाटा, खडी मशिन चौक (कोंढवा), वैदवाडी चौक, खराडी बायपास, खराडी जकात नाका, तुळापूर फाटा, बोपखेल फाटा, थेऊर फाटा, केसनंद फाटा, दिवे घाट माथा, नावले पूल आणि रविदर्शन (हडपसर) या ठिकाणांपासून पुढील मार्गांवर लागू राहील. शहरातून इतर जिल्ह्यांकडे जाणाऱ्या वाहनांसाठी पर्यायी मार्ग निश्चित करण्यात आले आहेत. सोलापूर, नगर, मुंबई, नाशिक तसेच कोल्हापूर, सांगली व सातारा येथून येणाऱ्या-जाणाऱ्या वाहनांनी चौफुला–केडगाव–न्हावरे, आळेफाटा तसेच शिरवळ–निरा–सुपे–केडगाव या मार्गांचा वापर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. १२ जुलै रोजी संत तुकाराम महाराजांची पालखी लोणीकाळभोर येथून पंढरपूरकडे प्रस्थान करणार आहे. त्यामुळे ११ जुलैच्या रात्री ११ वाजल्यापासून १२ जुलै रोजी पालखी यवत मार्गे पुढे जाईपर्यंत थेऊर फाट्यापासून सोलापूरकडे जाणारी वाहतूक बंद राहील. या वाहतुकीसाठी थेऊर–केसनंद–वाघोली–लोणीकंद–नगर रोड–शिक्रापूर–न्हावरे–दौंड तसेच मगरपट्टा–खराडी बायपास–नगर रोड–शिक्रापूर–केडगाव–चौफुला हे पर्यायी मार्ग उपलब्ध असतील. याशिवाय, ९ जुलै रोजी जुना पुणे–मुंबई महामार्ग आणि आळंदी रोड पूर्णपणे बंद राहतील. तसेच, ११ जुलै रोजी पुणे–सोलापूर महामार्ग आणि पुणे–सासवड रस्ता पूर्णपणे बंद ठेवण्यात येणार आहे. पेट्रोल व डिझेल टँकरसारख्या अत्यावश्यक सेवेतील वाहनांना इतर दिवशी वाहतूक करण्यासाठी वाहतूक शाखेची पूर्वपरवानगी घेणे आवश्यक आहे. अधिक माहितीसाठी नागरिकांनी वाहतूक मुख्य नियंत्रण कक्षाशी ०२०-२६६८५००० किंवा ०२०-२६६८४००० या दूरध्वनी क्रमांकांवर संपर्क साधावा.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *