![]()
सातारा-देवळाई ग्रामपंचायतीच्या नावावर असलेल्या तब्बल ८७ हजार ८४६ चौरस मीटर म्हणजे सुमारे ८ लाख ७८ हजार ४६० चौरस फूट मोकळ्या जागा आता अधिकृतपणे महापालिकेच्या ताब्यात येणार आहेत. या जागांचा सातबारा आता मनपाच्या नावावर करण्याची प्रक्रिया प्रशासनाने अखेर सुरू केली आहे. फेब्रुवारी २०१६ मध्ये सातारा-देवळाई परिसराचा मनपात समावेश केला. तरीही, ग्रामपंचायतीच्या नावावर असलेल्या या मोकळ्या भूखंडांचा शोध घेण्यास प्रशासनाला तब्बल ८ वर्षे लागली. या जागांसाठी मनपाने दोन स्वतंत्र अधिकाऱ्यांची नियुक्ती केली आहे. संपूर्ण शहराचे ‘रेकॉर्ड’ शोधणे आवश्यक महापालिकेत समाविष्ट झालेल्या सर्वच भागांत ग्रामपंचायतींच्या काळातील मालमत्ता नोंदींचा मोठा घोळ आहे. मनपाच्या मालकीच्या जागांची नोंद नसल्याने भूमाफिया आणि अतिक्रमणधारकांचे फावले आहे. उद्याने, शाळा किंवा सार्वजनिक प्रकल्पांसाठी मनपाकडे हक्काच्या जागा नाहीत. रेकॉर्ड अद्ययावत नसल्याने मनपाचे उत्पन्नाचे मार्गही बंद झाले आहेत. सातारा-देवळाईचा अनुभव पाहता, आता शहराच्या प्रत्येक झोनमध्ये ही मोहीम राबवून मालमत्तांचे हस्तांतर करणे अनिवार्य आहे. वेळीच ही जागा वाचवली नाही तर भविष्यात सार्वजनिक सोयी-सुविधांसाठी जागा उपलब्ध होणार नाहीत. ८ वर्षांच्या दुर्लक्षानंतर जाग फेब्रुवारी २०१६ मध्ये मनपात समावेश झाल्यानंतर हा भाग झपाट्याने विकसित झाला. आज या भागात २९ हजार मालमत्ता असून, कोणत्याही नियोजित सोयी-सुविधांशिवाय व्यापारी संकुले, लॉन्स, रुग्णालये आणि शाळांचे जाळे पसरले आहे. मात्र, या काळात ग्रामपंचायतीच्या नावावर असलेल्या मोकळ्या जागांकडे प्रशासनाने पूर्णपणे दुर्लक्ष केले. त्यामुळे अनेक जागांवर अनधिकृत बांधकामे झाली आणि अतिक्रमणे फोफावली.
Source link
दिव्य मराठी एक्सक्लुझिव्ह:सातारा-देवळाईतील 87 हजार चौ.मी.जागा लवकरच छत्रपती संभाजीनगर महापालिकेच्या नावावर