![]()
नागपुरात अन्न भेसळ आणि अस्वच्छतेविरोधात अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) आपली कारवाई तीव्र केली आहे. एफडीए आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या मार्गदर्शनाखाली, प्रसिद्ध हिरा स्वीटवर कारवाई केल्यानंतर आता ‘इंदूर नमकीन प्रॉडक्ट्स’ या मोठ्या आस्थापनेचा अन्न व्यवसाय परवाना तत्काळ निलंबित करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ९ जुलै रोजी अन्न सुरक्षा अधिकारी श्रीमती ए. एन. खंदारे यांच्या पथकाने कामठी रोडवरील पिली नदी परिसरातील वांजरा इंडस्ट्री ले-आऊट येथे असलेल्या ‘एम/एस इंदूर नमकीन प्रॉडक्ट्स’च्या कारखान्यावर छापा टाकला. या तपासणीदरम्यान अन्नसुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन झाल्याचे समोर आले. एफडीएच्या तपासणीत कारखान्यात धक्कादायक प्रकार उघडकीस आले. विक्रीसाठी साठवून ठेवलेल्या मावा बर्फी आणि बंगाली मिठाईला बुरशी लागली होती. याशिवाय, मुदतबाह्य मिल्क केक, दोडा बर्फी आणि चेरी देखील जप्त करण्यात आल्या. उत्पादनानंतर उरलेले व टाकाऊ अन्नपदार्थ थेट शीतगृहात साठवून ठेवण्यात आले होते. मिठाई तयार करण्याच्या प्रक्रियेत कमालीची अस्वच्छता असून तिथे माशांचा मोठा प्रादुर्भाव दिसून आला. ‘चमचम’ या गोड पदार्थाचे पॅकिंग वापरून झालेल्या जुन्या टिनच्या डब्यांमध्ये केले जात होते, ही बाबही निदर्शनास आली. हा सर्व अन्नसाठा मानवी आरोग्यासाठी अत्यंत घातक असल्याने, अधिकाऱ्यांनी घटनास्थळीच २७३ किलो वजनाचा माल जप्त केला. यामध्ये बुरशीयुक्त मिठाई आणि मुदतबाह्य पदार्थांचा समावेश होता. जप्त केलेल्या मालाची बाजारपेठेतील किंमत सुमारे ६१ हजार ८०० रुपये असून, तो आस्थापनेजवळील कचऱ्याच्या ढिगाऱ्यात टाकून नष्ट करण्यात आला.
Source link
इंदूर नमकीनचा परवाना तत्काळ निलंबित:अस्वच्छता आणि बुरशीयुक्त अन्न आढळल्याने एफडीएची कारवाई