Headlines

आंबे गावातील नागणे दाम्पत्य मृत्यू प्रकरणी वारसांना 5 लाखांची मदत:मोहोळचे आमदार राजू खरे यांच्या विधानसभेतील पाठपुराव्याला यश‎




आंबे येथील लक्ष्मण नागणे आणि अलका नागणे या शेतकरी दाम्पत्याचा विजेचा धक्का लागून २८ जून रोजी वटपौर्णिमेच्या दिवशी सकाळी मृत्यू झाला होता. नैसर्गिक आपत्ती आणि वीज वितरण कंपनीच्या चुकीमुळे मृत्यू ओढवलेल्या नागणे दाम्पत्यांच्या वारसांना राज्य शासनाकडून प्रत्येकी ५ लाख रुपये नुकसानभरपाई जाहीर केली असून वारसांपैकी एकाला शासकीय नोकरी देण्याचे आश्वासन महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले आहे. गुरुवारी रात्री मुंबईत बावनकुळे यांच्या दालनात झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती मोहोळचे आमदार राजू खरे यांनी दिली. या प्रश्नावर उत्तर देताना चंद्रशेखर बावनकुळे यांनी पावसाळी अधिवेशन संपण्यापूर्वी संबंधित अधिकाऱ्यांसोबत बैठक घेऊन योग्य तो निर्णय घेण्याचे आश्वासन दिले होते. त्या अनुषंगाने गुरुवारी रात्री महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत महत्त्वपूर्ण बैठक विधानभवन येथे पार पडली. यावेळी आ. राजू खरे उपस्थित होते. या बैठकीत नागणे कुटुंबाला दिलासा देणारे महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले. यामध्ये मयत पुरुष ५ लाख आणि महिला ५ लाख रुपये अशी आर्थिक मदत जाहीर करण्यात आली. तसेच संबंधित मयत कुटुंबातील दोन अपत्यांपैकी एका अपत्याला शासकीय सेवेत नोकरी देण्याचे आश्वासन महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले. या हृदयद्रावक घटनेच्या पार्श्वभूमीवर संबंधित कुटुंबाला आवश्यक शासकीय मदत तातडीने उपलब्ध करून देणे तसेच त्यांच्या वारसाला शासकीय सेवेत सामावून घेण्याबाबत सविस्तर चर्चा करून सकारात्मक निर्णय घेण्यात आला. या संवेदनशील विषयाची गांभीर्याने दखल घेत नागणे कुटुंबाला न्याय मिळवून देण्यासाठी पुढाकार घेतल्याबद्दल महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे तसेच महायुती सरकारचे आ. राजू खरे यांनी आभार मानले आहेत. पंढरपूर तालुक्यातील आंबे येथील नागणे कुटुंबावर ओढवलेल्या अत्यंत दुर्दैवी घटनेबाबत महाराष्ट्र विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनामध्ये आ. खरे यांनी हा प्रश्न उपस्थित केला होता. नैसर्गिक आपत्तीमध्ये बळी ठरलेल्या नागणे कुटुंबास नुकसान भरपाई देण्याबरोबरच वारस असलेल्या दोन अपत्यांपैकी एका अपत्याला शासकीय सेवेत नोकरी मिळणार का, असा प्रश्न आ. खरे यांनी विधानसभेत उपस्थित केला होता.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *