![]()
काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष ॲड. सय्यद अक्रम यांना आणि त्यांच्या कुटुंबाला जीवे मारण्याच्या धमक्या आल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. या प्रकरणी ॲड. अक्रम यांनी थेट पोलीस आयुक्त कार्यालयात लेखी तक्रार दाखल केली असून, दोषींवर तातडीने आणि कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. पोलिस आयुक्तांना दिलेल्या तक्रार अर्जानुसार, १० जुलै २०२६ रोजी संध्याकाळपासून ॲड. सय्यद अक्रम यांच्या मोबाईल क्रमांकावर सातत्याने धमकीचे संदेश येत आहेत. या संदेशांमध्ये त्यांना आणि त्यांच्या कुटुंबाला जीवे मारण्याची थेट धमकी दिली जात असल्याचे त्यांनी नमूद केले आहे. या धमकीच्या संदेशांचे स्क्रीनशॉट आणि झेरॉक्स प्रतीही त्यांनी पुराव्यासाठी पोलिसांना सादर केल्या आहेत. ॲड. सय्यद अक्रम यांनी आपल्या तक्रारीत म्हटले आहे की, काँग्रेसच्या शहर जिल्हाध्यक्षपदी निवड झाल्यापासून ते शहरातील विविध सामाजिक विषय आणि जनतेच्या प्रश्नांवर सातत्याने आक्रमक आंदोलने करत आहेत. नुकतेच राम मंदिरासंदर्भातील ‘चंदा चोरी’ विरोधात महात्मा गांधींच्या अहिंसेच्या मार्गाने केलेले सत्याग्रह आंदोलनही त्यांनी नमूद केले. या सर्व जनआंदोलनांचा आणि राजकीय-सामाजिक कार्याचा राग मनात धरूनच अज्ञात घटकांकडून आपल्याला आणि कुटुंबाला संपवण्याच्या धमक्या दिल्या जात असाव्यात, असा संशय त्यांनी व्यक्त केला आहे. सध्याची परिस्थिती पाहता आपल्या आणि आपल्या कुटुंबाच्या जीवाला मोठा धोका निर्माण झाला असून, अनुचित प्रकार घडण्याची शक्यता नाकारता येत नाही, असे ॲड. अक्रम यांनी म्हटले आहे. या गंभीर प्रकरणाची दखल घेऊन पोलिसांनी तत्परतेने तपास करावा आणि धमकी देणाऱ्या समाजकंटकांवर भारतीय न्याय संहितेतील (BNS) संबंधित कलमांनुसार कठोर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी पोलीस प्रशासनाकडे केली आहे. या मागणीसाठी काँग्रेसच्या शिष्टमंडळाने पोलीस उप आयुक्तांची भेट घेतली. यावेळी उप आयुक्तांनी या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेत सखोल चौकशी करून कायद्यानुसार आवश्यक ती कठोर कारवाई करण्यात येईल, असे आश्वासन दिले. यावेळी जिल्हाध्यक्ष किरण पाटील डोणगावकर, प्रदेश कार्याध्यक्ष (सांस्कृतिक विभाग) इब्राहिम पठाण, डॉ. निलेश आंबेवाडीकर, इंजि. विशाल बन्सवाल, मोहम्मद जाकीर, सय्यद अफझल हुसैन, ऋषिकेश महाजन, दिपाली मिसाळ, दीक्षा पवार, मुकेश सोनवणे, डॉ. अरुण शिरसाट, गणेश जाधव, अनिस पटेल यांच्यासह काँग्रेसचे अनेक पदाधिकारी उपस्थित होते.
Source link
छ.संभाजीनगर काँग्रेस शहराध्यक्षांना जीवे मारण्याची धमकी:सय्यद अक्रम यांची पोलिस आयुक्तांकडे तक्रार, तातडीने कठोर कारवाईची मागणी