![]()
हिंगोली जिल्हयात भूकंपरोधक बांधकाम, इमारतींची संरचनात्मक सुरक्षितता तसेच आपत्तीपूर्व तयारीसाठी उत्तराखंडमधील रुडकी येथील केंद्रीय इमारत संशोधन संस्थेच्या संचालकांसमवेत बैठक आयोजित करून आवश्यक तांत्रिक मार्गदर्शन घेतले जाणार आहे. तर भूकंपकेंद्राच्या परिसरातील गावांतील शासकिय इमारतींचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी यंत्रणांना दिल्या आहेत. जिल्ह्यात अलीकडे सातत्याने जाणवत असलेल्या सौम्य भूकंपाच्या धक्क्यांच्या पार्श्वभूमीवर भूकंप तसेच इतर संभाव्य नैसर्गिक आपत्तींच्या काळात जीवित व वित्तहानी कमीत कमी ठेवण्यासाठी शास्त्रशुद्ध व तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली आपत्ती व्यवस्थापनाचा कृती आराखडा तयार केला जाणार आहे. यासाठी स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड येथील भूगर्भशास्त्र विभागाचे प्राध्यापक व भूकंप तज्ज्ञ डॉ. टी. विजयकुमार यांची जिल्हा भूकंप आपत्ती व्यवस्थापन समितीवर तांत्रिक सल्लागार पदी तात्पुरती नियुक्ती करण्याबाबत कार्यवाही करण्याचे निर्देश जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी दिले. जिल्हाधिकारी गुप्ता यांनी भूकंप आपत्ती व्यवस्थापनाच्या उपाययोजनांचा सविस्तर आढावा घेतला. भूकंप आपत्तीच्या अनुषंगाने प्रतिबंधात्मक उपाययोजना, तांत्रिक मार्गदर्शन, जनजागृती तसेच विविध विभागांमधील समन्वय अधिक प्रभावी करण्याबाबत महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले. भूकंपाचे धक्के जाणवलेल्या परिसरातील शाळा, शासकीय कार्यालये व इतर सार्वजनिक इमारतींचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या सूचना त्यांनी यंत्रणांना दिल्या आहेत. संबंधित गट विकास अधिकाऱ्यांना देण्यात आले. या तपासणीचा सविस्तर अहवाल तातडीने जिल्हा प्रशासनाकडे सादर करण्याचेही निर्देश त्यांनी दिले. स्वामी रामानंद तिर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या भूकंपशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. टी. विजयकुमार यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थी, शिक्षक, स्थानिक स्वराज्य संस्थांचे कर्मचारी, स्वयंसेवी संस्था तसेच सर्वसामान्य नागरिकांसाठी भूकंप आपत्ती व्यवस्थापनाविषयी मार्गदर्शक सूचना तयार करून व्यापक जनजागृती कार्यक्रम राबविण्याच्या सूचना त्यांनी दिल्या आहेत. सर्व विभागांनी परस्पर समन्वय राखून आपत्ती व्यवस्थापनाची पूर्वतयारी सक्षमपणे पूर्ण करावी आणि नागरिकांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देत तत्परतेने कार्य करावे, असे निर्देश जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी यावेळी दिले.
Source link
हिंगोलीत भूकंपाच्या धक्क्यांनंतर जिल्हा प्रशासन सतर्क:रुडकीच्या केंद्रीय संशोधन संस्थेकडून घेणार तांत्रिक मार्गदर्शन