Headlines

पुण्यात अमली पदार्थ विक्री करणाऱ्या दोघांना अटक:26 लाखांहून अधिक किमतीचा मुद्देमाल जप्त




विमानतळ पोलिस ठाण्याच्या हद्दीत एम.डी. (मेफेड्रोन) या अमली पदार्थांची विक्री करणाऱ्या दोघांना अटक करण्यात आली आहे. या कारवाईत पोलिसांनी सुमारे 26 लाख 71 हजार 800 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. विमानतळ पोलिस ठाण्याचे तपास पथक गस्त घालत असताना, पोलिस शिपाई हरी पुंडे आणि लालू कन्हे यांना त्यांच्या बातमीदाराकडून माहिती मिळाली. खराडी बायपास चौकातून फॉरेस्ट पार्ककडे जाणाऱ्या रस्त्यावर एक व्यक्ती एम.डी. ड्रग्ज विक्रीसाठी येणार असल्याची ही माहिती होती. पोलिस निरीक्षक (गुन्हे) शरद शेळके यांना ही माहिती मिळाल्यानंतर त्यांनी तात्काळ कारवाईचे आदेश दिले. या माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचला आणि प्रितम प्रफुल्ल कुलकर्णी (वय 37, रा. वडगावशेरी, पुणे) याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून 3.59 ग्रॅम एम.डी. पावडर आणि एक मोटारसायकल जप्त करण्यात आली. कुलकर्णीच्या चौकशीतून मिळालेल्या माहितीनुसार, पोलिसांनी दुसरा आरोपी उबेद अन्सार खान (वय 27, रा. हडपसर, पुणे) याला खुळेवाडी परिसरातून अटक केली. खान हा देखील ड्रग्ज विक्रीसाठी आला असताना पोलिसांच्या ताब्यात आला. उबेद खानकडून 4 ग्रॅम एम.डी. पावडर आणि एक स्कॉर्पिओ कार जप्त करण्यात आली. या दोन्ही कारवायांमध्ये एकूण 26 लाख 71 हजार 800 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक नितीन राठोड करत आहेत. ही कारवाई पोलिस आयुक्त अमितेश कुमार, सहआयुक्त रंजनकुमार शर्मा, अपर पोलिस आयुक्त मनोज पाटील, पोलिस उपायुक्त सोमय मुंडे आणि सहाय्यक पोलिस आयुक्त प्रांजली सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. पोलिस निरीक्षक शरद शेळके यांच्या नेतृत्वाखालील पथकात लालू कन्हे, हरीप्रसाद पुंडे, अंकुश जोगदंडे, योगेश थोपटे, रुपेश पिसाळ, सचिन मांजरे, राहुल जोशी, प्रशांत सुतार, सागर कासार आणि अंबादास चव्हाण यांचा समावेश होता.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *