![]()
संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेचे (DRDO) तत्कालीन संचालक डॉ. प्रदीप कुरुलकर यांच्यावरील खटल्यात जप्त करण्यात आलेल्या इलेक्ट्रॉनिक उपकरणांची आठ सीलबंद पाकिटे न्यायालयात उघडण्यात आली. पाकिस्तानी महिला गुप्तहेराला देशाच्या गोपनीय माहिती पुरवल्याप्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल आहे. या प्रकरणातील एका पंचाची साक्ष आणि उलटतपासणी पुणे सत्र न्यायालयात पूर्ण झाली. दहशतवाद विरोधी पथकाने (ATS) जप्त केलेली ही इलेक्ट्रॉनिक उपकरणे सत्र न्यायाधीश पी. वाय. लाडेकर यांच्या न्यायालयात सादर करण्यात आली. यावेळी पंच म्हणून उपस्थित असलेल्या पुणे जिल्हा परिषदेतील एका कनिष्ठ सहाय्यक कर्मचाऱ्याची साक्ष नोंदविण्यात आली. सरकारी पक्षातर्फे विशेष सरकारी अभियोक्ता ॲड. उज्ज्वला पवार यांनी पंचाला तपासले. बचाव पक्षाचे वकील ऋषिकेश गानू यांनी पंचाचा उलटतपास घेतला. जप्त करण्यात आलेली उपकरणे जप्तीच्या वेळी कोणत्या अवस्थेत होती, ती सुरू होती की बंद, तसेच पंचनाम्यात नमूद केलेल्या इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या तपशिलासंदर्भात तांत्रिक स्वरूपाचे प्रश्न उपस्थित करण्यात आले. न्यायालयात उघडण्यात आलेल्या पाकिटांमध्ये वन प्लस कंपनीचे मोबाईल, मोबाईल चार्जर, लाल रंगाची डेटा केबल, पेनड्राइव्ह, एफएसएलकडून सीलबंद अवस्थेत परत आलेला वन प्लस कंपनीचा 10 टी मोबाईल, एचपी कंपनीची हार्डडिस्क, सीलबंद पत्रे आणि 16 फेब्रुवारी 2022 चे एक पत्र यांचा समावेश होता. आठव्या पाकिटात गुलाबी रंगाच्या कागदावरील गेट पासही दाखविण्यात आला. डॉ. कुरुलकर यांच्या कार्यालयातून मुंबईतील कार्यालयात पाठविण्यात आलेले मोबाईल, हार्डडिस्क आणि अन्य साहित्य असलेली पाकिटेही न्यायालयासमोर सादर करण्यात आली. या खटल्याची पुढील सुनावणी आज होणार असून, त्यावेळी सरकार पक्षाचे अन्य साक्षीदार तपासले जाण्याची शक्यता आहे. मोबाइलची पडताळणी आपल्या समोर झाली नव्हती उलटतपासणीत पंच साक्षीदाराने सायबर किंवा संगणक विषयातील कोणतेही तांत्रिक शिक्षण नसल्याचे मान्य केले. एटीएसने पंच म्हणून बोलावताना कोणताही लेखी आदेश दिला नव्हता, असेही त्यांनी सांगितले. तसेच मोबाईल कोणाच्या मालकीचा आहे, त्याची पावती किंवा कागदपत्रे दाखविण्यात आली नव्हती, मोबाईल किंवा चार्जरची पडताळणी आपल्या समोर झाली नव्हती, पेनड्राइव्हमध्ये काय माहिती आहे, हेही आपल्याला माहीत नसल्याचे साक्षीदाराने स्पष्ट केले. मात्र, जप्त साहित्य पंचनाम्यावेळी आपल्या समोरच पाकिटात ठेवण्यात आले, त्यावर लेबले आपल्या उपस्थितीत लावण्यात आली आणि आरोपी डॉ. कुरुलकर याने आपल्या समोरच स्वाक्षऱ्या केल्याचा दावा साक्षीदाराने ठामपणे केला.
Source link
डॉ. प्रदीप कुरुलकर खटला:जप्त मोबाईल्स, हार्डडिस्कची सीलबंद पाकिटे अखेर कोर्टात उघडली, पंचाची साक्ष नोंदवली, उलटतपासणी पूर्ण