Headlines

'तो ती आणि फुजी'च्या सेटवर मृण्मयीचा रुद्र अवतार:13 मिनिटांच्या 'त्या' सीनमुळे शेजारीही घाबरले; अभिनेत्रीने सांगितला पडद्यामागचा थरार




मराठी चित्रपटसृष्टीतील बहुचर्चित जोडी मृण्मयी गोडबोले आणि ललित प्रभाकर यांची प्रमुख भूमिका असलेला ‘तो ती आणि फुजी’ हा चित्रपट सध्या चर्चेत आहे. सोनी लिव्हवर प्रदर्शित होत असलेल्या या चित्रपटाच्या निमित्ताने मृण्मयीने शूटिंगदरम्यानचा एक अत्यंत थरारक आणि भावनिक अनुभव शेअर केला आहे. चित्रपटातील एका महत्त्वाच्या प्रसंगासाठी मृण्मयीने इतका टोकाचा अभिनय केला की, शूटिंग पाहणारेच नव्हे तर शेजारी राहणारे नागरिकही भीतीने घटनास्थळी धावून आले होते. सोनी लिव्‍हवर प्रदर्शित होत असलेला बहुप्रतिक्षित मराठी चित्रपट ‘तो ती आणि फुजी’ चर्चेत असताना मुख्य अभिनेत्री मृण्मयी गोडबोले यांनी सेटवरील काही खास गोष्टी शेअर केल्या आहेत. या चित्रपटासाठी दिलेली भावनिक गुंतवणूक किती सखोल होती, याचा उलगडा अभिनेत्रीने केला आहे. हा चित्रपट जरी मराठी आणि जपानी संस्कृतींचा शांत संगम असला तरी त्यातील पात्रांचा कठीण भूतकाळ पडद्यावर साकारण्यासाठी अशा अभिनयाची गरज होती की, जिथे काल्पनिक कथा आणि वास्तव यातील रेषा पुसट झाली होती. १३ मिनिटांचा ‘वन टेक’ शॉट अन् घबराट! या भूमिकेतील तीव्रतेबद्दल सांगताना मृण्मयी गोडबोले म्हणाली, “ललित आणि माझ्यामधील ब्रेक-अपचा सीन हा या चित्रपटातील सर्वात महत्त्वाच्या प्रसंगांपैकी एक होता. तो १३ मिनिटांचा एक सलग ‘वन टेक’ शॉट होता. या प्रसंगासाठी इतका टोकाचा राग आणि भावनिक उद्रेक आवश्यक होता की, मला प्रत्यक्ष ट्रेडमिल उलथवून टाकावे लागले. तो सीन इतका विध्वंसक होता आणि आमचा आवाज इतका मोठा होता की, शूटिंगच्या ठिकाणी शेजारी घाबरून तिथे जमा झाले. त्यांना वाटले की खरोखरंच काहीतरी गंभीर घडत आहे. माझ्या करिअरमधील हा आजवरचा सर्वात शारीरिकदृष्‍ट्या आणि भावनिकदृष्‍ट्या थकवणारा सीन होता.” मृण्मयी पुढे म्हणाली, “तुम्ही त्या क्षणात असता, तेव्हा तुम्ही फक्त अभिनय करत नसता, तर तो उद्वेग प्रत्यक्ष जगत असता. पण एक कलाकार म्हणून लोकांची ती घाबरलेली प्रतिक्रिया माझ्या अभिनयाची खरी पावती होती. तो अनुभव खूपच थकवणारा होता, तरीही त्या रात्री मी अत्यंत शांत मनाने घरी गेले, कारण मला माहित होते की आम्ही काहीतरी अतिशय प्रामाणिक आणि वास्तव टिपले आहे.” जपानच्या निसर्गात उलगडणारी प्रेमकहाणी मोहित टाकळकर दिग्दर्शित चित्रपट ‘तो ती आणि फुजी’ प्रादेशिक सिनेमातील एक महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे. या चित्रपटाचे कथानक मृण्मयी गोडबोले आणि ललित प्रभाकर यांनी साकारलेल्या एका जोडप्याची आहे, ज्यांचे एकेकाळचे उत्कट प्रेम स्वभाव, भिन्‍नता आणि अवास्तव मागण्यांमुळे एकमेकांसाठी त्रासदायक ठरले होते. सात वर्षांनंतर नशिबाने त्यांना जपानच्या शिस्तबद्ध आणि विलोभनीय निसर्गात पुन्हा एकत्र आणले आहे. आता तुटलेली ही नाती पुन्हा जोडली जाऊ शकतात का? याचा निर्णय घेण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *