Headlines

शहागंज, बायजीपुरा, टीव्ही सेंटरमध्ये वारंवार वीजपुरवठा खंडित:उन्हाळ्यात नागरिक त्रस्त; तांत्रिक बिघाडामुळे रात्री उशिरापर्यंत वीज गायब




छत्रपती संभाजीनगर शहरात उन्हाचा पारा वाढत असताना, शहागंज, राजाबाजार, बायजीपुरा, जाधवमंडी आणि टीव्ही सेंटर परिसरात वारंवार वीजपुरवठा खंडित होत आहे. यामुळे नागरिकांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. सोमवारी शहागंज परिसरात तांत्रिक बिघाडामुळे तीन तासांहून अधिक काळ वीजपुरवठा खंडित झाला होता, जो मध्यरात्री १२ वाजता पूर्ववत करण्यात आला. सोमवारी सायंकाळी ४ वाजता मौलाना आझाद चौकातील वीजवाहिनीमध्ये बिघाड झाल्याने शहागंज आणि बायजीपुरा परिसरातील वीजपुरवठा खंडित झाला. महावितरणने तात्पुरता पर्यायी वीजपुरवठा जोडला, परंतु रात्री ९ नंतर पुन्हा तांत्रिक अडचण निर्माण झाली. अतिरिक्त कार्यकारी अभियंता राजेंद्र राठोड यांनी दिलेल्या माहितीनुसार, महावितरणच्या २० कर्मचाऱ्यांच्या पथकाने युद्धपातळीवर काम करून रात्री १२ वाजेपर्यंत दुरुस्ती पूर्ण केली. सोमवार पाठोपाठ मंगळवारीही सिडको टीव्ही सेंटर परिसरात वीजपुरवठा खंडित झाला होता. कार्यकारी अभियंता प्रसाद महातोले यांनी सांगितले की, फ्युज गेल्यामुळे काही भागातील वीज गेली होती, इतर कोणतीही मोठी तांत्रिक समस्या नव्हती. त्यांनी पुढे स्पष्ट केले की, शहागंज भागात विजेचा अतिरिक्त भार (ओव्हरलोड) येत असल्याने या भागात वारंवार वीज जाण्याच्या घटना घडत आहेत. या भागांमध्ये वीजबिल वसुलीचे प्रमाण कमी असून, वीजचोरीच्या मोठ्या प्रमाणावर तक्रारी आहेत. वीजचोरीला आळा घालण्यासाठी महावितरणकडून धडक कारवाई केली जात असून, अनेकांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. बायजीपुरामध्ये नुकतीच क्षमता वाढ करण्यात आली असली तरी, ओव्हरलोडची समस्या अजूनही कायम आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *