Headlines

10 हजार किलो ई-कचऱ्याचे संकलन:कसब्यात पर्यावरणपूरक उपक्रम; शास्त्रोक्त पद्धतीने होणार विल्हेवाट




कसबा मतदारसंघात राबवण्यात आलेल्या ई-कचरा संकलन उपक्रमाला नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आहे. या मोहिमेअंतर्गत तब्बल १० हजार किलो ई-कचरा जमा करण्यात आला असून, वर्षानुवर्षे घरात पडून राहिलेल्या या कचऱ्याचे आता शास्त्रोक्त पद्धतीने विघटन केले जाणार आहे. आमदार हेमंत रासने यांच्या वाढदिवसानिमित्त ‘भेटवस्तू नको, ई-कचरा द्या’ या अभिनव संकल्पनेतून हा उपक्रम शनिपारजवळील कवठी अड्डा येथे पार पडला. नागरिकांनी घरातील जुन्या टेपरेकॉर्डरपासून टीव्ही, फ्रिजसारख्या मोठ्या इलेक्ट्रॉनिक वस्तूंपर्यंत विविध प्रकारचा ई-कचरा मोठ्या प्रमाणात जमा केला. घरातील ओला व सुका कचरा नियमितपणे महापालिकेकडे दिला जातो, परंतु खराब इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या विल्हेवाटीचा प्रश्न अनेकदा अनुत्तरित राहतो. मोबाईल, संगणक, टीव्ही, चार्जर्स, बॅटऱ्या यांसारख्या ई-कचऱ्यामध्ये शिसे, पारा, कॅडमियमसारखी घातक रसायने असतात. त्यांची योग्य विल्हेवाट न लागल्यास पर्यावरण आणि मानवी आरोग्यावर गंभीर परिणाम होऊ शकतात. यावेळी बोलताना महापौर मंजुषा नागपुरे म्हणाल्या की, महापालिकेतर्फे ओला-सुका कचरा रोज गोळा केला जातो, मात्र ई-कचऱ्याचे व्यवस्थापन ही एक मोठी समस्या आहे. इलेक्ट्रॉनिक वस्तूंमधील घातक रसायने माती, पाणी व हवेत मिसळून प्रदूषण निर्माण करतात. अशा परिस्थितीत हा उपक्रम पर्यावरण संरक्षणासाठी अत्यंत महत्त्वाचा आणि अनुकरणीय आहे. आमदार हेमंत रासने यांनी सांगितले की, ई-कचरा ही जागतिक पातळीवरील गंभीर समस्या आहे. वाढदिवसानिमित्त नागरिकांनी फुलांऐवजी ई-कचरा देऊन पर्यावरण संवर्धनासाठी पुढाकार घेतला, ही अत्यंत सकारात्मक बाब आहे. संकलित करण्यात आलेल्या १० हजार किलो ई-कचऱ्यावर महापालिकेमार्फत शास्त्रोक्त पद्धतीने प्रक्रिया करून त्याचे सुरक्षित विघटन केले जाईल. हा उपक्रम केवळ कचरा संकलन नसून, पर्यावरण रक्षणासाठी नागरिकांनी उचललेले एक सामूहिक पाऊल ठरणार आहे. यावेळी भाजपा शहराध्यक्ष धीरज घाटे, प्रदेश सरचिटणीस राजेश पांडे, स्थायी समिती अध्यक्ष श्रीनाथ भिमाले, कसबा मंडल अध्यक्ष अमित कंक, छगन बुलाखे, प्रशांत सुर्वे यांच्यासह सर्व नगरसेवक, पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *