![]()
देशपातळीवर गौरव मिळविलेल्या सांगोला तालुक्यातील शेळकेवाडी (शिवणे) जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या यशस्वी शैक्षणिक मॉडेलचा विस्तार आता संपूर्ण जिल्ह्यात करण्यात येणार आहे. जिल्हा परिषद शिक्षण व आरोग्य समितीच्या बैठकीत शालेय गणवेशाचे अनुदान ३०० वरून ५०० रुपये करण्याचा ठराव, मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या उपस्थिती भत्त्यात पाचपटीने वाढ, तसेच शिक्षणाच्या गुणवत्तेसाठी विशेष भरारी पथक स्थापन करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला. शिक्षण व आरोग्य समितीचे सभापती चेतनसिंह केदार-सावंत यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत शिक्षणाचा दर्जा उंचावण्यासाठी आणि विद्यार्थ्यांना अधिक सक्षम सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी अनेक निर्णय घेण्यात आले. बैठकीत सन २०२६-२७ या आर्थिक वर्षातील शिक्षण विभागाच्या खर्चास मंजुरी देण्यात आली. विद्यार्थ्यांना वेळेत पाठ्यपुस्तके, गणवेश व इतर शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून देण्याच्या सूचना देण्यात आल्या. तसेच जिल्ह्यातील शाळांच्या दुरुस्ती व बांधकामांची प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आले. बैठकीतील सर्वाधिक महत्त्वाचा निर्णय म्हणजे शालेय गणवेशासाठीचे अनुदान ३०० वरून ५०० रुपये करण्याचा ठराव करण्यात आला. मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या उपस्थिती भत्त्यात प्रतिदिन १ वरून ५ रुपये इतकी वाढ करण्यास समितीने मंजुरी दिली. महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजना आणि ‘माझी शाळा’ उपक्रमाचाही आढावा यावेळी घेण्यात आला. शिक्षणाच्या गुणवत्तेबाबत कोणतीही तडजोड केली जाणार नसल्याचे यावेळी सांगण्यात आले. ज्या ठिकाणी सुधारणा आवश्यक आहे, तेथे तातडीने उपाययोजना राबविण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. बैठकीस सांगोला पंचायत समितीच्या सभापती पूनम इंगवले, उपसभापती अजय सरगर, शिक्षण समिती सदस्य दीपाली ताड, माजी सभापती शिवाजी कांबळे, शिक्षणाधिकारी कादर शेख, अधिकारी, कर्मचारी, शेळकेवाडी शाळेचे शिक्षक तसेच शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य उपस्थित होते. ^देशपातळीवर गौरव मिळविलेल्या शेळकेवाडी (शिवणे) जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचा शैक्षणिक आदर्श आता सोलापूर जिल्ह्यातील शाळांमध्ये राबविण्यात येणार आहे. शिक्षणाची गुणवत्ता वाढविण्यासाठी विशेष भरारी पथक स्थापन करून सर्व शाळांचे नियमित निरीक्षण केले जाईल. उत्कृष्ट काम करणाऱ्या शाळा व शिक्षकांचा गौरव करण्यात येईल, तर मागे राहिलेल्या शाळांमध्ये आवश्यक सुधारणा तातडीने राबविल्या जातील. चेतनसिंह केदार, सभापती, शिक्षण व आरोग्य समिती
Source link
शालेय गणवेशाचे अनुदान 300 वरून 500 रुपये करणार:जिल्हा परिषद शिक्षण व आरोग्य समितीच्या बैठकीत घेतला महत्त्वाचा निर्णय, शिक्षणाचा दर्जा उंचावणार