![]()
पुणे शहरातील मुंढवा आणि मांजरी पोलीस ठाण्यांच्या हद्दीत अज्ञात व्यक्तींनी अनेक वाहनांची तोडफोड केली आहे. सोसायटी परिसरात उभ्या असलेल्या वाहनांना लक्ष्य करत नागरिकांना शिवीगाळ करून परिसरात दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात आला. पुणे शहरात वाहनांच्या तोडफोडीचे सत्र पुन्हा एकदा समोर आले आहे. तोडफोड करणाऱ्यांनी १७ आसनी प्रवासी वाहनासह काही चारचाकी आणि दुचाकी वाहनांना लक्ष्य केले. वाहनांच्या काचा फोडण्यात आल्या असून, इतर भागांचीही मोठ्या प्रमाणात तोडफोड करण्यात आली आहे. या अचानक घडलेल्या प्रकारामुळे वाहनमालकांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. आरोपींनी केवळ वाहनांची तोडफोड केली नाही, तर सोसायटीतील रहिवाशांना शिवीगाळ करत परिसरात भीतीचे वातावरण निर्माण केले. आरडाओरडा आणि तोडफोडीच्या आवाजामुळे नागरिक भयभीत झाले. घराबाहेर येण्याचा प्रयत्न करणाऱ्या रहिवाशांनाही धमकावण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. घटनेची माहिती मिळताच संबंधित पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांनी तातडीने चौकशी सुरू केली आहे. परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासले जात असून, आरोपींची ओळख पटवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. या घटनेत नेमक्या किती वाहनांचे आणि किती रुपयांचे नुकसान झाले, याचा तपशील गोळा केला जात आहे. पुण्यात वारंवार घडणाऱ्या वाहन तोडफोडीच्या घटनांमुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. रात्रीच्या वेळी पोलिसांची गस्त वाढवावी, सोसायट्यांजवळ सुरक्षा व्यवस्था मजबूत करावी आणि दहशत माजवणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी स्थानिक रहिवाशांकडून करण्यात येत आहे.
Source link
पुण्यात मुंढवा-मांजरी परिसरात वाहनांची तोडफोड:नागरिकांना शिवीगाळ करत दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न