![]()
शहरातील महावितरणचे ७० वर्षांचे सेवानिवृत्त कनिष्ठ अभियंता सायबर फसवणुकीचे बळी ठरले आहेत. त्यांच्या मोबाइलवर आलेल्या एका संशयास्पद एपीके फाइलवर क्लिक करणे त्यांना अत्यंत महाग पडले. या एका चुकीमुळे सायबर चोरट्याने त्यांच्या बँक खात्यावर डल्ला मारत तब्बल २४ लाख ७९ हजार ९८० रुपयांची ऑनलाइन फसवणूक केली. हा प्रकार २५ जून रोजी मध्यरात्री घडला. प्रकरणी १६ जुलै रोजी सिडको ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.२५ जून रोजी रात्री १२ वाजेच्या सुमारास फिर्यादींच्या मोबाइलवर पंजाब नॅशनल बँकेच्या नावाने एक संशयास्पद एपीके फाइल आली होती. ती अधिकृत समजून त्यांनी ओपन केली. यानंतर अवघ्या १० मिनिटांतच त्यांच्या खात्यातून पैसे काढल्याचे ६ मेसेज धडकले. या आर्थिक आघातानंतर त्यांनी तात्काळ सायबर हेल्पलाइन १९३० वर संपर्क साधून तक्रार नोंदवली. दिव्य मराठी इनसाइड स्टोरी: एका क्लिकने घेतला मोबाइलचा ताबा एपीके फाइल म्हणजे अँड्रॉइड ॲप्लिकेशनचे इन्स्टॉलेशन पॅकेज असते. फिर्यादींनी पंजाब नॅशनल बँकेच्या नावाने आलेली ही बनावट फाइल डाऊनलोड करताच, सायबर चोरांच्या मालवेअरने त्यांच्या मोबाइलचा संपूर्ण ताबा घेतला. यामुळे त्यांच्या बँक खात्याचे पासवर्ड आणि आलेले सर्व वन टाइम पासवर्ड (ओटीपी) गुन्हेगारांपर्यंत पोहोचतात आणि फसवणूक होते. मेसेज ट्रॅक, ओटीपी घेऊन फसवणे सोपे
‘एपीके’ म्हणजे ‘अँड्रॉइड पॅकेज किट’. अँड्रॉइड मोबाइलमध्ये कोणतीही ॲप इन्स्टॉल करण्यासाठी ‘.apk’ फाइल वापरली जाते. प्ले स्टोअरबाहेरून डाऊनलोड केलेली एपीके फाइल धोकादायक ठरू शकते. या फाइलच्या आधारे माहितीची चोरी, फोनवर पूर्ण नियंत्रण मिळवणे, मेसेज ट्रॅक करून ओटीपी घेऊन फसवणे अशा प्रकारे फसवणूक होऊ शकते. बातमीतून धडा: अनोळखी एपीके फाइल्स टाळा व्हॉट्सॲप किंवा एसएमएसवर आलेल्या अज्ञात एपीके फाइल्स डाऊनलोड करू नका, याने डेटा व बँक डिटेल्स चोरीला जाऊ शकतात. अधिकृत ॲप्स वापरा, कारण बँक कधीही थेट ॲप पाठवत नाही. बँकिंगच्या कामासाठी नेहमी प्ले स्टोअर किंवा ॲप स्टोअरवरूनच अधिकृत ॲप डाऊनलोड करा. तात्काळ उपाय : इंटरनेट बंद करून बँक खाते ब्लॉक करा सायबर फसवणूक झाल्याचे लक्षात येताच घाबरून न जाता सर्वात आधी मोबाइलचे इंटरनेट त्वरित बंद करा. त्यानंतर वेळ न दवडता ‘१९३०’ या राष्ट्रीय सायबर हेल्पलाइनवर कॉल करा आणि बँकेशी संपर्क साधून आपले बँक खाते तात्काळ ब्लॉक करा, जेणेकरून पुढील आर्थिक नुकसान टळेल.
Source link
सायबर चोरी:‘एपीके’ फाइल उघडताच निवृत्त अभियंत्याच्या खात्यातून 24 लाख लंपास