![]()
तालुक्यातील संत एकनाथ-सचिन घायाळ शुगर इंडस्ट्रीज यांनी २०२५-२६ च्या गाळप हंगामातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांची १९ कोटी ५० लाखांची एफआरपी थकविल्याच्या निषेधार्थ स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष माऊली मुळे, पवन शिसोदे यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांनी शुक्रवारी सकाळी ६ वाजेपासून पैठण तहसील कार्यालयासमोरील पाण्याच्या टाकीवर चढून १३ तास आंदोलन केले. शेतकऱ्यांच्या हक्काच्या पैशांसाठी महसूल प्रशासनाने कारखान्याची जप्ती व लिलाव प्रक्रिया सुरू केली होती. मात्र, प्रक्रियेतील कथित कायदेशीर त्रुटींमुळे ३ जुलै रोजीचा लिलाव स्थगित करण्यात आला. त्यानंतर महिना उलटत आला तरी नवीन लिलाव प्रक्रिया नसल्याने शेतकरी संघटनेने थेट पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलनाचा आक्रमक मार्ग स्वीकारला. खरीप हंगामात पैशांची गरज असताना हक्काच्या पैशांसाठी आंदोलन करावे लागत असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. दरम्यान, प्रशासनाने १५ दिवसांत कारवाईचे लेखी आश्वासन दिल्याने आंदोलन मागे घेण्यात आले. { २०२५-२६ च्या हंगामातील १९.५० कोटी रुपयांची थकीत एफआरपी तातडीने अदा करावी, कारखान्याच्या जप्त मालमत्तेचे पुनर्मूल्यांकन करून ई-लिलाव प्रक्रिया तात्काळ पूर्ण करावी. {३ जुलै रोजीच्या लिलाव प्रक्रियेतील कथित अनियमिततेची चौकशी करावी, चुकीची प्रक्रिया राबवणाऱ्या दोषी अधिकारी व कर्मचाऱ्यांना निलंबित करून कारवाई करावी, आदी मागण्या करण्यात आल्या आहेत.
Source link
स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक:19.50 कोटींच्या थकीत ऊस बिलासाठी पैठणला जलकुंभावर 13 तास आंदोलन