![]()
तालुक्यातील वरुड खुर्द येथील जिल्हा परिषद शाळेत १६ जुलै रोजी नशामुक्ती अभियान आणि बालविवाह मुक्त छत्रपती संभाजीनगर अभियानांतर्गत विशेष जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या मोहिमेद्वारे विद्यार्थी, शिक्षक आणि ग्रामस्थांना व्यसनमुक्ती व बालविवाह बंदीबाबत महत्त्वपूर्ण मार्गदर्शन करण्यात आले. या कार्यक्रमात समुदाय आरोग्य अधिकारी डॉ. सईद कादरी, आरोग्य सेवक विलास घुगे आणि शाळेचे मुख्याध्यापक टाकसाळे यांनी उपस्थितांशी संवाद साधला. तंबाखू, गुटखा, सिगारेट, मद्य आणि अमली पदार्थांच्या सेवनाने आरोग्यावर होणारे गंभीर परिणाम डॉ. सईद कादरी यांनी विशद केले. तरुणांनी व विद्यार्थ्यांनी व्यसनापासून दूर राहून निरोगी व सुदृढ जीवनशैलीचा अंगीकार करण्याचे आवाहन त्यांनी केले. आरोग्य सेवक विलास घुगे यांनी बालविवाहाचे सामाजिक, शैक्षणिक आणि मुलींच्या आरोग्यावर होणारे घातक परिणाम स्पष्ट केले. मुलींचे शिक्षण पूर्ण होणे आणि योग्य वयातच विवाह करणे किती गरजेचे आहे, यावर त्यांनी भर दिला. तसेच, बालविवाह प्रतिबंधक कायद्याची माहिती देऊन, असा प्रकार निदर्शनास आल्यास त्वरित प्रशासनाला कळविण्याचे आवाहन करण्यात आले. कार्यक्रमाच्या शेवटी, उपस्थित सर्व विद्यार्थी, शिक्षक आणि ग्रामस्थांनी व्यसनमुक्त आणि बालविवाहमुक्त समाज निर्माण करण्यासाठी सक्रिय योगदान देण्याची सामूहिक प्रतिज्ञा घेतली.
Source link
जनजागृती:वरुड खुर्द जि. प. शाळेत नशामुक्तीबाबत जनजागृती