![]()
आषाढी वारी म्हणजे भक्ती, सेवा आणि समर्पणाचा संगम. संत ज्ञानेश्वर महाराजांच्या आळंदी ते पंढरपूर पालखी सोहळ्यात सहभागी होणाऱ्या लाखो वारकऱ्यांच्या सेवेसाठी पैठणच्या वतीने गेल्या २६ वर्षांपासून मोफत आयुर्वेदिक चहा, शुद्ध पिण्याचे पाणी आणि बिस्किटांचे वाटप अखंडपणे सुरू आहे. वारीदरम्यान पाऊस, ऊन, वारा तसेच अशुद्ध पाण्यामुळे अनेक वारकऱ्यांना सर्दी, खोकला, ताप, अंगदुखी यांसारख्या त्रासांना सामोरे जावे लागते. स्वतः पायी वारी करताना आलेल्या अनुभवातून ॲड. किसनराव फटांगडे यांनी सुंठ, दालचिनी, वेलची, जायफळ आणि मिरी यांचा समावेश असलेला आयुर्वेदिक चहा वारकऱ्यांना देण्याचा संकल्प केला. त्यासोबतच शुद्ध पिण्याचे पाणी आणि बिस्किटेही मोफत उपलब्ध करून देण्यास सुरुवात केली. आज हा उपक्रम वारीतील एक वेगळी ओळख बनला आहे. या सेवाकार्यात विस्तार अधिकारी दशरथ खरात, सेवानिवृत्त शिक्षक नामदेव गवळी, ॲड. वैभव चव्हाण, मच्छिंद्र गोरे, विठ्ठल गोरे, मच्छिंद्र गलधर, रमेश घाटविसावे, अप्पासाहेब दळवे, संकेत मिसाळ, गोदावरी जामदार, जनाबाई बोंबले आणि राधाबाई काळे यांच्यासह अनेक सेवेकरी सहभागी आहेत. शासकीय कर्मचारी, व्यापारी, शेतकरी, मजूर आणि वकील अशा विविध क्षेत्रांतील हे सेवेकरी स्वतःची सुट्टी, व्यवसाय आणि मजुरी बाजूला ठेवून केवळ सेवाभावातून या उपक्रमात सहभागी होतात. विशेष आयुर्वेदिक मसाल्याचा वापर या सेवेसाठी १० क्विंटल साखर, २५ किलो चहापत्ती, ५०० लिटर दूध, ३५ खोके बिस्किटे, १३ गॅस सिलिंडर, एक पाण्याचा टँकर, एक ट्रक तसेच सुंठ, दालचिनी, वेलची, जायफळ आणि मिरीपासून तयार करण्यात येणारा विशेष आयुर्वेदिक मसाला वापरला जातो. १७ पुरुष आणि ३ महिला अशा २० सेवेकऱ्यांचा चमू सलग १५ दिवस वारकऱ्यांच्या सेवेसाठी कार्यरत असतो. दररोज सुमारे १० ते १२ हजार कप आयुर्वेदिक चहासह शुद्ध पिण्याचे पाणी वारकऱ्यांना मोफत दिले जाते. वारकरीही संतप्रसाद मानून रांगेत ही सेवा स्वीकारतात.
Source link
26 वर्षांपासून नि:स्वार्थ सेवा:वारकऱ्यांना दररोज 12 हजार कप आयुर्वेदिक चहाचे वाटप