![]()
कन्हान नगर परिषद हद्दीतील तुकाराम नगरजवळ, कन्हान रेल्वे स्टेशनला लागून असलेल्या रेल्वे ट्रॅकवर शनिवार, १८ जुलै रोजी पहाटे ४ ते ५ च्या सुमारास रेल्वेच्या धडकेत सहा हरणांचा जागीच मृत्यू झाला. अन्न आणि पाण्याच्या शोधात रेल्वे रुळ ओलांडत असताना हा अपघात घडला. घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिक, वन विभाग आणि रेल्वेचे अधिकारी-कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. कन्हान रेल्वे जंक्शनला लागूनच कांद्री-मनसर आणि कामठी वनपरिक्षेत्राचे झुडुपी व राखीव जंगल आहे. हा परिसर रामटेक वनपरिक्षेत्र आणि पेंच व्याघ्र प्रकल्पाच्या बफर झोनला जोडलेला आहे. कन्हान नदीच्या खोऱ्यामुळे प्राण्यांना पाणी आणि अन्नासाठी हा एक नैसर्गिक मार्ग मिळतो. कामठी प्रादेशिक वनपरिक्षेत्रात येणाऱ्या या भागात झुडुपी जंगल असल्याने हरणांचा नेहमी वावर असतो. नागपूर जिल्हा आणि आसपासच्या रेल्वे मार्गांवर वन्यजीवांचे अपघात वाढले आहेत. दक्षिण पूर्व मध्य रेल्वेच्या नागपूर विभागात २०२५ या वर्षात रेल्वेच्या धडकेत लहान-मोठ्या ४८६ प्राण्यांचा मृत्यू झाल्याची नोंद आहे. यापूर्वी फेब्रुवारी २०२६ मध्ये बुटीबोरी-जामठा परिसरात एका वाघाचा, तर ऑक्टोबर २०२५ मध्ये बल्लारशाह-गोंदिया मार्गावर एका वाघाचा आणि सांबराचा रेल्वे अपघातात मृत्यू झाला होता. कामठी प्रादेशिक वनपरिक्षेत्रांतर्गत येणाऱ्या कन्हान व कांद्री-मनसरच्या झुडुपी जंगलात पेंच आणि रामटेकच्या बफर झोनमुळे समृद्ध वन्यजीव आढळतात. चितळ, सांबर, काळवीट आणि निलगाय (रोही) यांसारखे शाकाहारी प्राणी मोठ्या संख्येने असून, ते पाण्यासाठी कन्हान नदीच्या पात्राकडे येतात. या तृणभक्षी प्राण्यांच्या उपलब्धतेमुळे बिबट्या, लांडगे, कोल्हे आणि तरस यांसारखे मांसाहारी वन्यजीवही भक्ष्याच्या शोधात येथे फिरताना दिसतात. रानडुक्कर आणि जंगली मांजरींचाही येथे मोठ्या प्रमाणात वावर असून, रात्री आणि पहाटेच्या वेळी हे प्राणी अन्न-पाण्याच्या शोधात रेल्वे रुळांच्या दिशेने येतात. जंगलाला लागून असलेल्या रेल्वे मार्गांवर वन्यजीवांचे अपघात रोखण्यासाठी रेल्वे ट्रॅकच्या दोन्ही बाजूंना कुंपण घालणे किंवा प्राण्यांच्या येण्या-जाण्याच्या मार्गावर अंडरपास तयार करणे गरजेचे आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात याविषयी जनहित याचिका दाखल असून, न्यायालयाने रेल्वे आणि वन विभागाला उपाययोजना करण्याचे निर्देश दिले आहेत, अशी माहिती सामाजिक कार्यकर्ते संजय सत्येकार यांनी दिली.
Source link
रेल्वेच्या धडकेत 6 हरणांचा जागीच मृत्यू:अन्न-पाण्याच्या शोधात ट्रॅक ओलांडताना कन्हानमध्ये घडली घटना