![]()
गंगापूर तालुक्यात यंदा पावसाळा एक महिना उशिरा सुरू झाला, त्यातच पावसाची मोठी तूट निर्माण झाल्याने खरीप हंगाम संकटात सापडला आहे. आतापर्यंत खरिपाच्या वार्षिक पेरणी क्षेत्राच्या अवघ्या ४३ टक्केच पेरण्या पूर्ण झाल्या आहेत. ५७ टक्के पेरण्या अजूनही खोळंबल्या आहेत. गेल्या आठवडाभरापासून पावसाने पूर्णपणे उघडीप दिल्याने आधीच पेरलेली ४९ हजार ८०० हेक्टरवरील पिके धोक्यात आली आहेत. गंगापूर तालुक्यात १ ते ९ जुलैदरम्यान पावसाला सुरुवात झाली. मात्र, या सहा ते सात दिवसांत तालुक्यात अवघा ६६ मिमी पाऊस पडला. तरीही वेळ निघून जात असल्याने शेतकऱ्यांनी पावसाच्या भरवशावर पेरण्या आटोपल्या. १५ जुलैपर्यंत तालुक्यात ४३ टक्के पेरण्या पूर्ण झाल्या आहेत. मात्र, अद्याप ५७ टक्के क्षेत्रावर पेरण्या बाकी आहेत. यंदा कपाशी लागवडीपासून ते कापूस काढणीपर्यंतचा अवाढव्य खर्च, मजुरांची भासणारी तीव्र टंचाई, कापसाला मिळणारा अनिश्चित भाव यामुळे शेतकऱ्यांनी कपाशीकडे पाठ फिरवली आहे. त्याऐवजी मका आणि तुरीच्या पेरणीला अधिक पसंती दिली आहे. तालुक्यात खरिपाचे एकूण १,०७,६८१ हेक्टर क्षेत्र असून, त्यापैकी ४९,८७५ हेक्टरवर पेरण्या झाल्या आहेत. ५३,८४१ हेक्टर क्षेत्र अजूनही पडून आहे. गंगापूर तालुक्यामध्ये पावसाअभावी शेतातील पिके सुकून चालली आहेत. समाधानकारक पाऊस नाही; पिके माना टाकू लागली तालुक्यात १५ जुलैपर्यंतच्या १२६ मिमी पाऊस पडणे अपेक्षित होते. मात्र, आतापर्यंत ६६.६ मिमी (५३ टक्के) पाऊस पडला आहे. ix गापूर ६६, मांजरी ६२, भेंडाळा ७१, शेंदूरवादा ६१.९, तुर्काबाद ७२.५, वाळूज ७५.८, हर्सूल ६८, डोणगाव ७०, सिद्धनाथ वाडगाव ६४.१, आसेगाव ५५.६, गाजगाव ६४, जामगाव ६६ मिमी पाऊस झाला आहे. १२ महसूल मंडळांमध्ये सरासरीपेक्षा कमी पाऊस तालुक्यातील सर्व १२ महसूल मंडळांमध्ये सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला आहे. गेल्या आठवड्यापासून पावसाने दडी मारली आहे. कडक ऊन, पाण्याचा अभाव यामुळे कोवळ्या पिकांनी माना टाकायला सुरुवात केली आहे. दुबार पेरणीचे संकट टाळण्यासाठी आता पुढील दोन-तीन दिवसांत तालुक्यात दमदार पावसाची अत्यंत गरज आहे. बळीराजा चातकासारखी आभाळाकडे डोळे लावून बसला आहे.
Source link
गंगापूरमध्ये खरिपाच्या 43 टक्केच पेरण्या:पावसाची 47 टक्के तूट, 50 हजार हेक्टरवरील पिके संकटात