![]()
पर्यावरण संवर्धनाला लोकचळवळीचे स्वरूप देण्याच्या उद्देशाने दैनिक दिव्य मराठीतर्फे ७ जुलै ते ६ ऑगस्ट या कालावधीत देशभर राबविण्यात येणाऱ्या “एक वृक्ष–एक जीवन’ या महाअभियानात तब्बल ७५ लाख वृक्ष लागवडीचे महाउद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे. देशभरातील सुमारे ५ हजार शाळा, दीड हजार गृहनिर्माण संस्था आणि अडीच हजार विविध सामाजिक संस्था या अभियानात सहभाग नोंदवत आहे. याच अभियानाचा एक भाग म्हणून सावेडी येथील श्री समर्थ विद्या मंदिर प्रशाला येथे पर्यावरणदूत शिक्षक डॉ. अमोल बागुल यांनी स्वखर्चातून सुमारे २५० विद्यार्थ्यांना अश्वगंधाच्या बिया चिटकवलेली २५० विशेष वृत्तपत्रे वितरित करून पर्यावरण संवर्धनाचा अभिनव संदेश दिला. या प्रसंगी शालेय समितीचे चेअरमन ॲड. किशोर देशपांडे, प्राचार्या वसुधा जोशी उपस्थित होते. ॲड. देशपांडे म्हणाले, “दैनिक दिव्य मराठीने वर्तमानपत्रालाच वृक्षारोपणाचे प्रभावी माध्यम बनविण्याची संकल्पना अत्यंत अभिनव, दूरदृष्टीपूर्ण आणि समाजप्रबोधन करणारी आहे. कागदामध्ये बिया समाविष्ट करून त्या प्रत्येक घरापर्यंत पोहोचविण्याचा हा उपक्रम विद्यार्थ्यांच्या मनात पर्यावरणाबद्दल प्रेम, जबाबदारी आणि कृतीची प्रेरणा निर्माण करणारा ठरेल. अशा उपक्रमातून “वृक्ष लावा, वृक्ष जगवा’ हा संदेश प्रत्यक्ष कृतीतून समाजापर्यंत पोहोचेल.” या विशेष वृत्तपत्रातील बिया असलेले कागद कुंडीत अथवा मोकळ्या जागेत पेरल्यानंतर त्यातून उगवणाऱ्या रोपांसोबत विद्यार्थ्यांनी सेल्फी काढून अभियानाच्या पोर्टलवर अपलोड करायचा आहे. त्यानंतर संबंधित विद्यार्थ्यांना डिजीटल प्रमाणपत्र प्रदान करण्यात येणार आहे.
Source link
"एक वृक्ष – एक जीवन' अभियान, 250 विद्यार्थ्यांना वृत्तपत्रांचे वाटप:डॉ. अमोल बागुल यांच्याकडून विद्यार्थ्यांना बियायुक्त वृत्तपत्रांचे वितरण