Headlines

लाओसमध्ये नोकरी नव्हे, सायबर गुलामी:नाशिकमधील तरुणाची दाेन महिन्यांच्या नरक यातनानंतर थरारक सुटका, सात-आठ भारतीयांचे एकत्रित पलायन




परदेशात नोकरी, महिन्याला दीड लाख पगार, मोफत व्हिसाचे आमिष दाखवून नाशिकच्या एका तरुणाला बँकॉकमार्गे लाओसमध्ये नेण्यात आले. तेथे पोहोचताच पासपोर्ट जप्त करण्यात आला, डोक्यावर बंदूक ठेवून दिवसाचे 14 तास सायबर फसवणूक करण्यास भाग पाडण्यात आले. निकृष्ट अन्न, मारहाण, प्रत्येक क्षणी मृत्यूची भीती अशा नरकयातना त्याने दोन महिने सहन केल्या. अखेर सात-आठ भारतीयांसह त्याने तेथून पलायन केले. दूतावासाच्या मदतीने भारतात परतण्यास यश मिळवले. ‘दिव्य मराठी’शी बोलताना त्याने हा संपूर्ण थरारक प्रवास प्रथमच उलगडला. ही कहाणी त्याच्याच शब्दांत…. मित्राच्या ओळखीने माझा एका एजंटशी संपर्क झाला. महिन्याला 79 हजार रुपये पगार, त्यासोबत इन्सेंटीव्ह मिळून दीड लाख रुपये उत्पन्न मिळेल, अशी खात्री देण्यात आली. विमानाचे तिकीट, व्हिसा आणि इतर सर्व खर्च कंपनी उचलणार असल्याचे सांगण्यात आल्याने मला कोणताही संशय आला नाही. टुरिस्ट व्हिसावर मी बँकॉकला गेलो. तेथून म्यानमार-थायलंड-लाओस सीमेजवळ नेण्यात आले. आम्ही नेमके कुठे जात आहोत किंवा कोणत्या कंपनीत काम करणार आहोत, याची कोणतीही माहिती आम्हाला देण्यात आली नव्हती. सीमेवरील नदी पार करून आम्हाला लाओसमध्ये नेण्यात आले. तेथे पोहोचताच सर्वांचे पासपोर्ट जप्त करण्यात आले आणि एका बंदिस्त कॅम्पसमध्ये ठेवण्यात आले. सुमारे सहा किलोमीटर परिसरात तब्बल 2299 सायबर फसवणूक करणाऱ्या कंपन्या कार्यरत असल्याचे आम्हाला तेथे समजले. हे कोणतेही आयटी ऑफिस नव्हते, तर सायबर फसवणुकीचे मोठे अड्डे होते. माझ्या डोक्यावर बंदूक लावून ‘काम कर, नाहीतर जिवंत राहणार नाहीस,’ अशी धमकी देण्यात आली. या कॅम्पमध्ये सोशल मीडियाच्या माध्यमातून परदेशात राहणाऱ्या भारतीयांशी मैत्री करायची, त्यांचा विश्वास संपादन करायचा आणि त्यांना क्रिप्टोकरन्सीमध्ये गुंतवणूक करण्यास प्रवृत्त करून फसवणूक करायची, हेच काम दिले जात होते. दिवसाला 14-14 तास काम, कोणतीही सुट्टी नाही, जेवणासाठी सडलेली अंडी आणि निकृष्ट दर्जाचे अन्न दिले जात होते. कामात चूक झाली किंवा ठरवलेले टार्गेट पूर्ण झाले नाही, तर मारहाण केली जात होती. प्रत्येक दिवस भीतीच्या सावटाखाली जात होता. एका रात्री आम्ही ठरवले, इथे रोज मरण्यापेक्षा एकदा जीव धोक्यात घालून बाहेर पडू. त्याआधी आम्ही काही तरुणांनी मिळून मोठ्या शिताफीने भारतीय दूतावासाशी संपर्क साधला. तेथील श्रीकांत सर आमच्यासाठी देवदूत ठरले. त्यांनी आम्हाला धीर दिला, योग्य मार्गदर्शन केले आणि पळून जाण्याचा आत्मविश्वास दिला. अखेर नाशिकमधून आलेल्या माझ्यासह सात-आठ भारतीय तरुणांनी कॅम्पमधून पलायन केले आणि थेट लाओसच्या एका पोलिस ठाण्याजवळ पोहोचलो. सुरुवातीला पोलिसांनी आम्हाला हाकलून लावले. मात्र, आम्ही पुन्हा त्याच ठिकाणी जाऊन मदतीची विनंती करत राहिलो. तब्बल आठ दिवस आम्ही पोलिस ठाण्याबाहेरच रात्री काढल्या. दरम्यान, एक चिनी नागरिक तेथे आला आणि आम्हाला चीनच्या पोलिसांकडे घेऊन गेला. तेथे सायबर माफियांकडून आमच्यावर चोरीचा व चोरी करून पळून गेल्याचा आरोप करण्यात आला. मात्र, आम्ही सर्व भारतीय तरुणांनी आमची खरी परिस्थिती आणि संपूर्ण घटनाक्रम अधिकाऱ्यांसमोर मांडला. त्यानंतर संबंधित अधिकाऱ्यांनी आमच्यावर विश्वास ठेवत संबंधितांना आमचे पासपोर्ट परत देण्याचे आदेश दिले. चीनी पोलिसांच्या मदतीने आम्हाला आमचे जमा करण्यात आलेले पासपोर्ट पुन्हा मिळाले आणि तेथून मायदेशी परत येण्याचा मार्ग खुला झाला. भारतीय दूतावासाच्या समन्वयातून अखेर आम्हाला भारतात सुखरूप परतता येईल, अशी व्यवस्था करण्यात आली. लाओसमधील हा परिसर त्यामानाने सुरक्षित आहे. मात्र जे नाशिकमधील काही तरुण अडकले आहेत, ते म्यानमारच्या परिसरातील जंगलामध्ये आहेत. तेथील संपूर्ण कॅम्पमध्ये स्फोटके लावल्याची चर्चा तेथे आहे. कोणीही त्या ठिकाणी हल्ला केल्यास पुरावे नष्ट करण्याच्या दृष्टीने हे करण्यात आले आहे. म्यानमारमध्ये भारतीय दूतावास नसल्याने तेथे अडकलेल्या भारतीयांची परिस्थिती आणखी गंभीर आहे. आजही अनेक भारतीय तरुण त्या कॅम्पमध्ये अडकले आहेत. त्यांना अमानुष छळ सहन करावा लागत आहे. सायबर फ्रॉड करणाऱ्या 2299 कंपन्या; 39% कमिशन चीनला लाओस या ठिकाणी सहा किलोमीटरच्या परिसरात सायबर फसवणूक करणाऱ्या सुमारे 2299 कंपन्या कार्यरत आहेत. या सर्व कंपन्यांच्या माध्यमातून प्राप्त होणाऱ्या उत्पन्नापैकी 39 टक्के वाटा हा चीनकडे जातो, असेही आम्हाला तेथील चर्चांमधून समजले. त्यामुळे या सर्वांवर चीनचे नियंत्रण असल्याचे आम्हाला स्पष्टपणे जाणवले होते. शब्दांकन : सचिन जैन



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *