![]()
दिल्लीत ‘नीट’ पेपरफुटीविरोधात सुरू असलेल्या तीव्र आंदोलनाचे पडसाद आता मुंबईत उमटण्याची शक्यता आहे. याच पार्श्वभूमीवर मुंबईत कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिस प्रशासनाने अत्यंत मोठा निर्णय घेतला आहे. सुरक्षेचा उपाय म्हणून आगामी २३ जुलै ते ६ ऑगस्ट या १५ दिवसांच्या कालावधीसाठी मुंबईत जमावबंदीचे आदेश जारी करण्यात आले आहेत. मुंबई पोलिसांनी एक परिपत्रक जारी करुन ही माहिती दिली. १५ दिवसांसाठी कडक निर्बंध मुंबई पोलिसांनी जारी केलेल्या प्रतिबंधात्मक आदेशानुसार, २३ जुलै ते ६ ऑगस्ट दरम्यान मुंबई शहरात ५ किंवा त्यापेक्षा जास्त व्यक्ती एकत्र येण्यावर पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे. या काळात कोणत्याही प्रकारची आंदोलने, मोर्चे, निदर्शने किंवा सभा घेण्यास सक्त मनाई असेल. तसेच, शांतता भंग होऊ नये यासाठी लाऊडस्पीकरच्या वापरावरही पोलिसांनी कडक निर्बंध लादले आहेत. दिल्लीतील आंदोलनाचा मुंबईत प्रभाव? दिल्लीतील ‘नीट’ पेपरफुटीचा मुद्दा सध्या देशभरात चांगलाच गाजत आहे. तिथे सुरू असलेल्या विद्यार्थ्यांच्या आणि विविध संघटनांच्या आंदोलनांमुळे वातावरण अत्यंत संवेदनशील बनले आहे. मुंबईतही याचे पडसाद उमटून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, तसेच कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी मुंबई पोलिसांनी आधीच खबरदारी घेत हे प्रतिबंधात्मक पाऊल उचलले आहे. या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही प्रशासनाने दिला आहे. ‘या’ गोष्टींना असणार सूट
जमावबंदी लागू केली असली तरी शहराचे दैनंदिन जनजीवन विस्कळीत होऊ नये, यासाठी पोलिसांनी पत्रात काही महत्त्वाच्या सवलती स्पष्ट केल्या आहेत. खालील ठिकाणी या नियमातून सूट मिळेल: लग्न आणि अंत्यविधी: विवाहसोहळे आणि स्मशानभूमीकडे जाणाऱ्या अंत्ययात्रांना यातून पूर्ण सूट असेल. शाळा-महाविद्यालये: शैक्षणिक कार्यासाठी शाळा, महाविद्यालये आणि इतर शैक्षणिक संस्थांमध्ये जमणाऱ्या विद्यार्थ्यांना आणि शिक्षकांना कोणतीही अडचण नसेल. मनोरंजन: चित्रपटगृहे, नाट्यगृहे किंवा सार्वजनिक मनोरंजनाच्या ठिकाणी चित्रपट वा नाटक पाहण्यासाठी होणाऱ्या गर्दीवर निर्बंध नसतील. नोकरी आणि कामकाज: कारखाने, दुकाने, बाजारपेठांमधील दैनंदिन व्यापार, सरकारी कार्यालये, न्यायालये तसेच कंपन्यांच्या आणि सोसायट्यांच्या अधिकृत बैठकांना यातून वगळण्यात आले आहे. उल्लंघन केल्यास कडक कारवाईचा इशारा हे आदेश संपूर्ण बृहन्मुंबई क्षेत्रासाठी लागू असून, सार्वजनिक ठिकाणी आणि सरकारी कार्यालयांमध्ये ते ठळकपणे लावले जाणार आहेत. याशिवाय लाऊडस्पीकर आणि इतर माध्यमांतून याची घोषणाही केली जाईल. आदेशाची मुदत संपल्यानंतरही, या काळात जर कोणी या नियमांचे उल्लंघन केले असेल, तर त्यांच्यावर कडक कायदेशीर कारवाई आणि दंडात्मक शिक्षा केली जाईल, असा स्पष्ट इशारा पोलीस प्रशासनाने या पत्राद्वारे दिला आहे. हेही वाचा आंदोलक संसदेजवळ, अश्रूधुराच्या नळकांड्या फोडल्या:सर्वच गेटवरील सुरक्षा वाढवली, अभिजीत दीपकेने अचानक उपोषण सोडले ‘कॉकरोच जनता पार्टी’चा (CJP) मोर्चा संसद भवनाच्या परिसरात पोहोचला आहे. आंदोलकांना रोखण्यासाठी पोलिसांनी संसदेजवळ अश्रूधुराच्या नळकांड्या फोडल्या आणि सर्व प्रवेशद्वारांवर सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली आहे. आंदोलकांनी राजीव चौक आणि मंडी हाऊस मेट्रो स्थानकांमध्ये प्रवेश केला. अनेकांनी बॅरिकेड्स तोडून संसद मार्ग पोलीस ठाण्यापर्यंत मजल मारली; त्यानंतर त्यांना ताब्यात घेण्यात आले. दरम्यान, CJP चे संस्थापक अभिजित दीपके यांनी त्यांचे उपोषण मागे घेतले आहे. सोनम वांगचुक यांना लवकरात लवकर जंतरमंतरवर आणले नाही, तर आपण संसदेच्या दिशेने मोर्चा काढू, असे त्यांनी जाहीर केले. सविस्तर वाचा
Source link
मुंबई पोलिसांचा मोठा निर्णय:नीट आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर 23 जुलैपासून 15 दिवस जमावबंदी लागू