![]()
पुण्यातील बुधवार पेठेतील ऐतिहासिक भिडे वाडा राष्ट्रीय स्मारकाच्या उभारणीच्या कामाची उपमहापौर परशुराम वाडेकर यांनी पाहणी केली. यावेळी त्यांनी संबंधित अधिकारी, अभियंते आणि वास्तुविशारदांकडून कामाच्या प्रगतीचा आढावा घेतला. महात्मा फुले द्विशताब्दी जयंती वर्षातच स्मारकाचे काम दर्जेदार आणि नियोजित वेळेत पूर्ण करण्याचे निर्देश वाडेकर यांनी दिले. या भिडे वाड्यात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले आणि महात्मा ज्योतिराव फुले यांनी १८४८ मध्ये भारतातील मुलींसाठी पहिली शाळा सुरू केली होती. शिक्षण, समता आणि सामाजिक परिवर्तनाची मुहूर्तमेढ रोवल्यामुळे भारतीय सामाजिक इतिहासात या वास्तूला विशेष महत्त्व आहे. ही वास्तू प्रत्येक नागरिकासाठी प्रेरणास्थान मानली जाते. पाहणी दौऱ्यावेळी भवन विभागाचे अधीक्षक अभियंता बिपीन शिंदे, कार्यकारी अभियंता धायगुडे, उपअभियंता पांडकर तसेच आर्किटेक्ट धनंजय सालकर उपस्थित होते. अधिकाऱ्यांनी उपमहापौर वाडेकर यांना स्मारकाच्या वास्तुरचनेची सद्यस्थिती, विविध विकासकामे आणि पुढील टप्प्यांतील नियोजनाची माहिती दिली. स्मारकात येणाऱ्या प्रत्येक नागरिकाला महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या कार्याचा प्रेरणादायी अनुभव मिळावा, यासाठी आवश्यक सुविधा आणि माहितीपर उपक्रम विकसित करण्यावर भर देण्याच्या सूचना उपमहापौर वाडेकर यांनी केल्या. यावेळी वाडेकर यांनी भिडे वाड्याच्या जतन आणि संवर्धनासाठी झालेल्या पहिल्या आंदोलनाची आठवण करून दिली. या आंदोलनासाठी त्यांच्यावर ११ गुन्हे दाखल झाल्याचे त्यांनी सांगितले. ऐतिहासिक वास्तूचे संरक्षण होऊन ती भावी पिढ्यांसाठी प्रेरणास्थान म्हणून उभी राहावी, ही त्या आंदोलनामागील भावना होती, असे ते म्हणाले. आज त्याच संकल्पनेचे राष्ट्रीय स्मारकाच्या रूपाने साकार होत असलेले चित्र समाधानकारक असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. महात्मा ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी वंचित, शोषित आणि महिलांना शिक्षणाचा अधिकार मिळवून देण्यासाठी केलेले कार्य संपूर्ण मानवतेसाठी दीपस्तंभ आहे. त्यांच्या विचारांचा वारसा जतन करून पुढील पिढीपर्यंत पोहोचविण्याचे कार्य या स्मारकाच्या माध्यमातून अधिक प्रभावीपणे होईल, असा विश्वास वाडेकर यांनी व्यक्त केला.
Source link
भिडे वाडा राष्ट्रीय स्मारकाच्या कामाची उपमहापौरांकडून पाहणी:महात्मा फुले द्विशताब्दी वर्षातच पूर्ण करण्याचे निर्देश