![]()
हिपॅटायटिससारख्या गंभीर यकृतविकाराबाबत जनजागृती निर्माण करण्यासाठी आणि नागरिकांना निरोगी जीवनशैलीचा संदेश देण्यासाठी शहरात रविवार, १९ रोजी सकाळी आयोजित करण्यात आलेल्या वॉकेथॉनला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. डॉ. हेडगेवार हॉस्पिटल, भाराणी मेमोरियल क्रिटिकल केअर युनिट, डॉ. अंजली कविमंडन मेमोरियल हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या उपक्रमात नागरिकांनी सहभाग घेत “फिट अमरावती, सुदृढ अमरावती”चा संदेश दिला. ऑनलाईन पूर्वनोंदणीच्या माध्यमातून आयोजित करण्यात आलेल्या या वॉकेथॉनमध्ये आबालवृद्धांसह लहान मुलांनीही मोठ्या उत्साहाने सहभाग घेतला. एकसमान टी-शर्ट परिधान करून सहभागी नागरिकांनी शिस्तबद्ध पद्धतीने रॅली पूर्ण केली. मार्गात पाणी, बिस्कीटे, चॉकलेटची व्यवस्था करण्यात आली होती. डॉ. हेडगेवार हॉस्पिटल आयसीयू, रेडियंट हॉस्पिटल, कल्याणनगर चौक, महानुभव आश्रम, फरशी स्टॉप चौक मार्गे रॅली डॉ. अंजली कविमंडन मेमोरियल हॉस्पिटल येथे पोहोचली. समारोपानंतर सहभागींसाठी पौष्टिक नाश्त्याची व्यवस्था करण्यात आली होती. तसेच वॉकेथॉन यशस्वीरित्या पूर्ण करणाऱ्या सर्वांना पदके प्रदान करून गौरवण्यात आले. यावेळी डॉ. अनिल कविमंडन, डॉ. पल्लवी शेटे, डॉ. प्रज्ञा बन्सोड, वनिता कविमंडन, डॉ. रोहिणी यादगिरे, श्रीरंग कविमंडन, ॲड. डॉ. प्राजक्ता पात्रिकर, केदार जोशी, विकास केमदेव, मनीष जामनेरकर, डॉ. सुभाष मालाणी, डॉ. कमलेश टावरी, राजेश माळोदे, ॲड. चोपडे, सुरेश जोशी, पर्वतकर, जयेश सेठिया, सारंग पांडे, समीर देशपांडे, डॉ. पंजाब म्हात्रे, राजेंद्र पेलागडे यांचेसह अनेक डॉक्टर्स, सी. ए., वकील, व्यावसायिक, प्रतिष्ठित नागरिक सहभागी होते. फिट अमरावती, सुदृढ अमरावतीसाठी चला. चालण्याचा आनंद घेऊया. आरोग्याचा संदेश घरोघरी पोहोचवूया! असे संदेश देणारा हा रविवार स्मरणीय ठरला.हिपॅटायटिस हा यकृताला होणारा दाह किंवा संसर्गजन्य आजार आहे. सुरुवातीला त्याची लक्षणे स्पष्ट दिसत नसल्याने अनेक रुग्णांना आजार उशिरा लक्षात येतो. थकवा, भूक न लागणे, मळमळ, काविळ, पोटदुखी यांसारखी लक्षणे काही रुग्णांमध्ये दिसून येतात. वेळेवर निदान व उपचार न झाल्यास यकृत निकामी होणे, सिरोसिस किंवा यकृताच्या कर्करोगासारख्या गंभीर गुंतागुंती निर्माण होऊ शकतात. वेळेवर तपासणी, लसीकरण, योग्य उपचार आणि निरोगी जीवनशैलीद्वारे या आजारावर नियंत्रण मिळविता येते. हिपॅटायटिसबाबत जनजागृती, नियमित आरोग्य तपासणी आणि प्रतिबंधात्मक उपाययोजनांचा अवलंब केल्यास या आजाराचा धोका मोठ्या प्रमाणात कमी करता येऊ शकतो. चेपे यांच्या शंखनादाने सोहळ्यााला सुरुवात सकाळी डॉ. हेडगेवार हॉस्पिटल आयसीयूपासून वॉकेथॉनला प्रारंभ झाला. निवासी उपजिल्हाधिकारी संतोष काकडे आणि जिल्हा क्रीडा अधिकारी ममता कोळमकर यांच्या हस्ते रॅलीचे उद्घाटन करण्यात आले. दाम्पत्य चेपे यांच्या शंखनादाने कार्यक्रमाची सुरुवात होताच परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. यंदाच्या जागतिक हिपॅटायटिस दिनाची संकल्पना “हिपॅटायटिस : चला, यातील अडथळे दूर करूया” अशी असून त्यानुसार जनजागृतीपर संदेश देणारे विविध फलक सहभागींच्या हातात झळकले.
Source link
हिपॅटायटीस जनजागृती वॉकेथॉनमधून शहरामध्ये निरोगी जीवनशैलीचा संदेश:फिट अमरावती, सुदृढ अमरावतीचा संदेश देत नागरिक झाले सहभागी