Headlines

नाथ महाराजांच्या पायी दिंडीत 6 हजार वारकऱ्यांवर उपचार:रेड स्वस्तिक सोसायटीची 17 वर्षांची अविरत आरोग्यसेवा‎




संत एकनाथ महाराजांची आषाढी पायी दिंडी पंढरीच्या वाटेवर भक्तिरसात न्हाऊन निघाली आहे. या पायी प्रवासात वारकऱ्यांच्या चरणांची आणि आरोग्याची काळजी घेण्याचे पवित्र काम रेड स्वस्तिक सोसायटी (छत्रपती संभाजीनगर शाखा) गेल्या १७ वर्षांपासून अविरत करत आहे. यंदाही या सेवेचे व्रत जोपासत, दिंडीच्या अवघ्या पहिल्या १२ दिवसांत तब्बल ६ हजार वारकऱ्यांवर वैद्यकीय उपचार करून मोफत औषधांचे वाटप करण्यात आले आहे. ७ जुलै रोजी पैठणहून पंढरपूरकडे प्रस्थान केलेल्या या सोहळ्यात छत्रपती संभाजीनगर, अहिल्यानगर आणि बीड जिल्ह्यातील हजारो वारकरी सहभागी झाले आहेत. १२ मुक्कामांच्या टप्प्यात ऊन, वारा अन् पावसाची तमा न बाळगता रेड स्वस्तिकचे वैद्यकीय पथक वारकऱ्यांसोबत पायी चालत आरोग्यसेवा पुरवत आहे. डॉ. अभिजित सपकाळ यांच्या नेतृत्वाखाली के. डी. देशमुख, समन्वयक गणेश कुलकर्णी, विजय पवार, डॉ. मंगेश सपकाळ, डॉ. अमोल हिवाळे, अभिषेक मते, अथर्व मालकर, महेश सरवदे, सीए झंवर आणि दत्ता आडे यांच्यासह आरोग्य पथक सेवा बजावत असून ही सेवा पंढरपूरपर्यंत सुरू राहणार असल्याची माहिती डॉ. अभिजित सपकाळ यांनी दिली. ९ लाख रुपयांचे औषध बदलत्या वातावरणामुळे वारकऱ्यांमध्ये सर्दी, खोकला, पडसे, गुडघेदुखी व सांधेदुखीचे प्रमाण अधिक पाहायला मिळत आहे. यावर तातडीने उपचार करत, वारकऱ्यांची आरोग्य तपासणी केली जात आहे. पथकाकडे सुमारे ९ लाख रुपयांचा औषधसाठा उपलब्ध असून गरजेनुसार त्याचे मोफत वाटप सुरू आहे. थकलेल्या वारकऱ्यांच्या पायांना मसाज करून स्वयंसेवक त्यांना नवा उत्साह देत आहेत.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *