Headlines

‘विनायकी क्रीडा महोत्सव’ 26 जुलैपासून:सात स्पर्धांमध्ये 1500 हून अधिक खेळाडू सहभागी होणार




सोमेश्वर फाउंडेशनतर्फे माजी आमदार विनायक निम्हण यांच्या जयंतीनिमित्त २६ जुलै ते २२ ऑगस्ट २०२६ दरम्यान २७व्या ‘विनायकी क्रीडा महोत्सवा’चे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवात रोलर स्केटिंग, कॅरम, बुद्धिबळ, बॅडमिंटन, मल्लखांब, तायक्वांदो आणि धनुर्विद्या अशा सात विविध खेळांच्या स्पर्धा होणार आहेत. फाउंडेशनचे सदस्य आणि नगरसेवक सनी निम्हण यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. या महोत्सवात एकूण १५०० ते २००० खेळाडू सहभागी होण्याची अपेक्षा असून, विजेत्यांना एकूण साडेआठ लाख रुपयांची पारितोषिके दिली जाणार आहेत. महोत्सवाची सुरुवात २६ जुलै रोजी पाषाण-सूस रस्त्यावरील सनीज वर्ल्ड येथील पेरी डॉट हॉलमध्ये होणाऱ्या खुली जिल्हास्तरीय रोलर स्केटिंग स्पर्धेने होईल. सहा ते अठरा वर्षे वयोगटातील सुमारे १०० खेळाडूंनी या स्पर्धेसाठी आतापर्यंत सहभाग नोंदवला आहे. महाराष्ट्र कॅरम असोसिएशन आणि कॅरम असोसिएशन ऑफ पुणे यांच्या मान्यतेने तिसरी कै. विनायक निम्हण राज्य मानांकन कॅरम स्पर्धा ७ ते ९ ऑगस्टदरम्यान सनी स्पोर्ट्स किंग्डम येथे आयोजित केली जाईल. पुरुष व महिला एकेरीतील विजेत्यांना एकूण एक लाख दहा हजार रुपयांची पारितोषिके दिली जातील. अखिल भारतीय आणि महाराष्ट्र बुद्धिबळ संघटनेच्या मान्यतेखालील बुद्धिबळ स्पर्धा १ व २ ऑगस्ट रोजी होणार आहे. या स्पर्धेसाठी २०० खेळाडूंनी सहभाग निश्चित केला असून, दोन लाख रुपयांची रोख पारितोषिके ठेवण्यात आली आहेत. बॅडमिंटन स्पर्धा सोमेश्वरवाडीतील द लाईफ स्पोर्ट्स येथे विविध वयोगटांत पार पडेल. जिल्हास्तरीय इनडोअर धनुर्विद्या स्पर्धा ८ व ९ ऑगस्ट रोजी, तर सुमारे ३०० खेळाडूंची मल्लखांब स्पर्धा ९ ऑगस्ट रोजी होणार आहे. तायक्वांदो स्पर्धा २१ व २२ ऑगस्ट रोजी क्युरोगी आणि पुमसे प्रकारांत होईल, ज्यात सुमारे ५०० खेळाडू सहभागी होण्याची अपेक्षा आहे. या सर्व स्पर्धांमधील विजेत्यांना रोख पारितोषिके, करंडक, पदके आणि प्रशस्तिपत्रके देऊन गौरवण्यात येईल. स्पर्धेत सहभागी होण्यासाठी इच्छुक खेळाडूंनी 8308123555 या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आयोजकांनी कळवले आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *