Headlines

पुणे पोलिसांना मोठे यश:88 कोटींच्या आर्थिक घोटाळ्यातील मुख्य आरोपी UAE मधून अटकेत




जास्त परताव्याचे आमिष दाखवून गुंतवणूकदारांची तब्बल ८८ कोटी रुपयांची फसवणूक करणाऱ्या एपीएस वेल्थ व्हेंचर्स एलएलपी प्रकरणातील मुख्य आरोपी अविनाश अर्जुन राठोड याला संयुक्त अरब अमिराती (यूएई) येथे अटक करण्यात आली आहे. पुणे शहर पोलिसांच्या आर्थिक व सायबर गुन्हे शाखेने आंतरराष्ट्रीय स्तरावरील समन्वयातून ही महत्त्वपूर्ण कारवाई केली आहे. या प्रकरणी चतु:शृंगी पोलीस ठाण्यात २० ऑगस्ट २०२३ रोजी भारतीय दंड संहितेतील फसवणुकीच्या कलमांसह एमपीआयडी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. कंपनीचे संचालक अविनाश अर्जुन राठोड आणि विशाखा अविनाश राठोड यांनी जास्त परताव्याचे आश्वासन देत गुंतवणूकदारांकडून मोठ्या प्रमाणावर पैसे उभे केले होते. तपासात फिर्यादीची ८६.३७ लाख रुपयांची, तर इतर अनेक गुंतवणूकदारांची मिळून सुमारे ८८ कोटी रुपयांची फसवणूक झाल्याचे निष्पन्न झाले. गुन्हा दाखल झाल्यानंतर दोन्ही आरोपी परदेशात फरार झाले होते. त्यामुळे त्यांच्या विरोधात न्यायालयाने रेड कॉर्नर नोटीस जारी केली होती. त्याआधारे आंतरराष्ट्रीय यंत्रणांशी समन्वय साधून २३ जुलै २०२६ रोजी यूएईमधील संबंधित अधिकाऱ्यांनी अविनाश राठोड याला ताब्यात घेतले. सध्या त्याला भारतात आणण्यासाठी प्रत्यार्पणाची कायदेशीर प्रक्रिया सुरू असून, पुणे पोलिसांचे पथक त्यासाठी आवश्यक कार्यवाही करत आहे. या गुन्ह्यातील उर्वरित फरार आरोपींनाही भारतात आणण्यासाठी विविध देशांतील तपास यंत्रणांच्या मदतीने प्रयत्न सुरू असल्याची माहिती आर्थिक व सायबर गुन्हे शाखेने दिली आहे. या कारवाईमुळे आर्थिक गुन्हे करून परदेशात पळून जाणाऱ्या आरोपींवरही कायद्याचा बडगा उगारला जाईल, असा ठोस संदेश गेला असून, फसवणूक झालेल्या गुंतवणूकदारांना न्याय मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *