.

तालुक्यातील श्रीक्षेत्र वरूर (धाकटी पंढरी) येथे आषाढी एकादशीनिमित्त हजारो भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली. चारशे वर्षांची परंपरा लाभलेल्या या स्वयंभू देवस्थानात दिवसभर धार्मिक आणि सामाजिक कार्यक्रमांची रेलचेल होती. विठ्ठलनामाच्या अखंड गजराने संपूर्ण मंदिर परिसर भक्तिमय झाला होता.
आषाढी एकादशीनिमित्त पहाटे श्रीक्षेत्र पैठण येथून कावडीद्वारे आणलेल्या पवित्र जलाने श्रींचा गंगाजलाभिषेक करण्यात आला. त्यानंतर लघुरुद्राभिषेक, ग्रामप्रदक्षिणा, हरिनामाच्या गजरात रिंगण सोहळा पार पडला. सायंकाळी दिनकर महाराज यांच्या कीर्तनाने भाविक मंत्रमुग्ध झाले. पंढरपूरप्रमाणे येथे दरवर्षी अखंड सप्ताह, दिंडी, रिंगण सोहळा आणि विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. त्यामुळे श्रीक्षेत्र वरूरला ‘धाकटी पंढरी’ अशी ओळख मिळाली असल्याचे मुकुंद अंचावले यांनी सांगितले. महोत्सवानिमित्त वरूर रोडवर विविध संस्था आणि ग्रामस्थांच्या वतीने भाविकांसाठी फराळाचे वाटप करण्यात आले. भक्ती नागरी सहकारी पतसंस्था, स्वामी समर्थ सेवा केंद्र, धनश्री इंटरप्राईजेस, भगवे वादळ धनगर गल्ली, अनुसया भजनी मंडळ, याराना ग्रुप, जयस्तु मराठा ग्रुप, अजिंक्य लॉन्स, वरूर ग्रामस्थ तसेच गणेश बेडके व बाबासाहेब दगडू बेडके यांच्या वतीने सेवा देण्यात आली. या निमित्त हनुमान मंदिरासमोर रक्तदान शिबिर घेण्यात आले. यात ४२ रक्तदात्यांनी रक्तदान केले असून अहिल्यानगर ब्लड बँकेने रक्तसंकलन केले. आरोग्य विभागाच्या वतीने भाविकांसाठी आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. आमदार विलास भुमरे, माजी आमदार चंद्रशेखर घुले, गटविकास अधिकारी सोनल शहा, पोलिस निरीक्षक मोहन बोरसे आदींनी श्रींचे दर्शन घेतले.