Headlines

ठाण्यात निवृत्त अधिकाऱ्याला घातला 65 लाखांचा गंडा:शेअर बाजारात दुप्पट परतावा देण्याचे आमिष




नवी मुंबईतील ‘स्मॉल इंडस्ट्रीज डेव्हलपमेंट बँक ऑफ इंडिया’च्या (सिडबी) ७३ वर्षीय निवृत्त सरव्यवस्थापकाची ऑनलाइन शेअर ट्रेडिंगच्या बहाण्याने ६५.१९ लाख रुपयांची फसवणूक झाल्याची माहिती पोलिसांनी रविवारी दिली. फसवणूक करणाऱ्या भामट्यांनी नवी मुंबईतील खारघर येथे राहणाऱ्या या पीडित व्यक्तीला २३ जून रोजी एका व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये जोडले. शेअर ट्रेडिंगच्या माध्यमातून दुप्पट परतावा देण्याचे आमिष ग्रुप ॲडमिनने दिले. ग्रुपवर असलेल्या लोगोमुळे हा ग्रुप अधिकृत असल्याचे त्यांना वाटले, असे एका पोलिस अधिकाऱ्याने सांगितले. फसवणूक करणाऱ्यांनी पीडिताला एका लिंकद्वारे खोटे ॲप डाऊनलोड करण्यास भाग पाडले आणि विश्वास जिंकण्यासाठी बनावट सेबी नोंदणी प्रमाणपत्रे पाठवली, असे अधिकाऱ्याने सांगितले. ३० जून ते २२ जुलै या कालावधीत पीडित अधिकाऱ्याने आरोपींनी दिलेल्या विविध बँक खात्यांमध्ये अनेक टप्प्यांत ६५.१९ लाख रुपये जमा केले. ॲपवर १२.४ कोटींचे दाखवत होते बॅलन्स खोट्या ॲपवर १२.४ कोटी रुपयांची बनावट रक्कम (बॅलन्स) दिसत होती. जेव्हा अधिकाऱ्याने पैसे काढण्याचा प्रयत्न केला तेव्हा भामट्यांनी आणखी २७ लाख रुपयांची मागणी केली. तसेच हे पैसे न दिल्यास खाते गोठवण्याची धमकी दिली, अशी माहिती पोलिसांनी दिली. त्यानंतर पीडित अधिकाऱ्याने राष्ट्रीय सायबर क्राइम पोर्टलवर तक्रार दाखल केली. या तक्रारीवरून पोलिसांनी तपास सुरू केला आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *