Headlines

शिवाजी पार्क येथील आंदोलनाला पोलिसांची परवानगी नव्हती:आयोजकांविरोधात गुन्हा दाखल, तपासाला वेग




मुंबईतील शिवाजी पार्क येथे विद्यार्थ्यांच्या समर्थनार्थ झालेल्या मोठ्या आंदोलनाप्रकरणी आता आयोजकांच्या अडचणी वाढल्या आहेत. या कार्यक्रमासाठी पोलिसांची आवश्यक परवानगी घेतली नसल्याचा आरोप करत शिवाजी पार्क पोलिसांनी आयोजकांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. या घटनेमुळे आंदोलनाच्या आयोजनासंदर्भातील नियमांचे पालन, गर्दी व्यवस्थापन आणि कायदा-सुव्यवस्थेच्या प्रश्नांवर पुन्हा चर्चा सुरू झाली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शिवाजी पार्क येथे झालेल्या या कार्यक्रमासाठी अधिकृत परवानगी देण्यात आलेली नव्हती. तरीही मोठ्या संख्येने नागरिक आणि आंदोलक एकत्र आल्याने परिसरात मोठी गर्दी झाली. याचा वाहतुकीवरही अंशतः परिणाम झाल्याचे पोलिसांनी नमूद केले आहे. परिस्थिती नियंत्रणात राहावी यासाठी कार्यक्रमस्थळी मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. प्राथमिक तपासादरम्यान आयोजकांनी आवश्यक पोलिस परवानगी न घेता कार्यक्रम आयोजित केल्याचे समोर आल्याचा दावा पोलिसांनी केला आहे. त्यानंतर संबंधित कायदेशीर तरतुदींनुसार माजी नगरसेवक यशवंत किल्लेदार आणि आमदार महेश सावंत यांच्याविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या प्रकरणात नेमकी जबाबदारी कोणाची होती, गर्दी नियंत्रणासाठी कोणती व्यवस्था करण्यात आली होती आणि पोलिसांची पूर्वपरवानगी न घेण्यामागे काय कारण होते, याचा तपास सुरू आहे. यासाठी घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेज, विविध व्हिडिओ आणि इतर पुरावे तपासले जात आहेत. तपासातून समोर येणाऱ्या निष्कर्षांच्या आधारे पुढील कायदेशीर कारवाई केली जाईल, असे पोलिसांनी स्पष्ट केले आहे. दरम्यान, या प्रकरणाबाबत प्रतिक्रिया जाणून घेण्यासाठी संबंधितांशी संपर्क साधण्यात आला असता, आमदार महेश सावंत आणि यशवंत किल्लेदार यांनी अद्याप आपल्याला अशा कोणत्याही गुन्ह्याची माहिती मिळालेली नसल्याचे सांगितले. आंदोलनाची पार्श्वभूमी नीट परीक्षा, पेपरफुटी प्रकरण आणि विद्यार्थ्यांवरील कथित पोलिस कारवाईच्या निषेधार्थ मुंबईतील शिवाजी पार्क परिसरात मोठ्या प्रमाणावर आंदोलन आयोजित करण्यात आले होते. या आंदोलनाला विविध विद्यार्थी, सामाजिक कार्यकर्ते आणि राजकीय नेत्यांनी पाठिंबा दर्शवला होता. मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित राहिल्याने परिसरात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते. या आंदोलनानंतर विविध व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून त्यावरून राजकीय आरोप-प्रत्यारोपही सुरू आहेत. आता या आंदोलनाच्या आयोजनावरच कायदेशीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले असून, परवानगीशिवाय सार्वजनिक कार्यक्रम घेतल्याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केल्याने या प्रकरणाला नवे वळण मिळाले आहे. तपासातून पुढे आणखी कोणाची भूमिका समोर येते आणि पोलिसांकडून कोणती कारवाई केली जाते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. हेही वाचा.. पेपरफुटीचं हे रॅकेट कोणत्या मंत्र्याच्या आशीर्वादाने सुरूय?:MPSC ‘औषध निरीक्षक’ भरतीवरून हर्षवर्धन सपकाळ यांचा सरकारवर घणाघात देशभरात ‘नीट’ परीक्षेचा वाद पेटलेला असतानाच, आता महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) ‘औषध निरीक्षक’ भरतीत पेपरफुटी आणि गुणांमध्ये फेरफार झाल्याच्या दाव्याने राज्यात मोठी खळबळ उडवून दिली आहे. उमेदवारांनी या कथित गैरव्यवहाराचे व्हॉट्सअॅप चॅट्स आणि डिजिटल पुरावे आयोगाला सादर करून चौकशीची मागणी केली आहे. या गंभीर प्रकरणावर राष्ट्रवादीचे नेते महेबुब शेख यांच्यानंतर आता काँग्रेस नेते हर्षवर्धन सपकाळ यांनीही प्रतिक्रिया दिली आहे. पुराव्यांसह तक्रारी समोर येऊनही सरकार शांत का? असा संतप्त सवाल करत सपकाळ यांनी राज्य सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. सविस्तर वाचा



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *