![]()
भंडारा जिल्ह्यातील पालांदूर परिसरातील तिरखुरी ते किटाडी मार्गावर रविवार, 26 जुलै रोजी सायंकाळी 5 वाजता एका वाघाने गाईवर हल्ला केला. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. स्थानिकांनुसार, या भागात चार वाघांचा वावर असून, त्यामुळे या मार्गावरून प्रवास करणाऱ्यांना आणि शेतकऱ्यांना धोका निर्माण झाला आहे. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन स्थानिक प्रशासन आणि ग्रामस्थांनी नागरिकांना खबरदारी घेण्याचे आवाहन केले आहे. अड्याळ, किटाडी आणि तिरखुरी मार्गावर सकाळी 8 ते सायंकाळी 5 या वेळेत दुचाकीस्वार आणि सायकलस्वारांनी एकट्याने प्रवास करणे टाळावे, अशा सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच शेतात काम करताना किंवा प्रवास करताना नागरिकांनी समूहाने राहावे आणि आवाज करत प्रवास करावा, असेही सांगण्यात आले आहे. भंडारा जिल्हा नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्पाला लागून असल्याने मानवी वस्तीत वाघांच्या शिरकावाच्या आणि हल्ल्यांच्या घटना वारंवार घडत आहेत. यापूर्वी जुलै महिन्यात तुमसर तालुक्यातील हेटी येथे वाघाच्या हल्ल्यात एका गुराख्याचा मृत्यू झाला होता. एप्रिल महिन्यात साकोली तालुक्यातील आमगाव येथे एका महिलेवर वाघाने हल्ला केला होता, जिथे तिच्या 18 वर्षांच्या मुलाने वाघाला पळवून लावून आईचा जीव वाचवला. मार्च महिन्यातही साकोली परिसरात 15 दिवसांच्या अंतरात वाघाच्या हल्ल्यात दोन ग्रामस्थांना जीव गमवावा लागला होता. वारंवार घडणाऱ्या या घटनांमुळे नागरिकांमध्ये चिंता वाढली आहे. पालांदूर आणि लगतच्या परिसरात वाघांचा वाढता वावर पाहता, वनविभागाने या क्षेत्रात तात्काळ गस्त वाढवावी, कॅमेऱ्यांच्या मदतीने वाघांच्या हालचालींवर लक्ष ठेवावे आणि परिसरातील वाघांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी ग्रामस्थांकडून केली जात आहे.
Source link
भंडारा जिल्ह्यात वाघाची दहशत:तिरखुरी-किटाडी मार्गावर गाईवर हल्ला; परिसरात 4 वाघांचा वावर