![]()
गेल्या काही दिवसांपासून शरद पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस एनडीएमध्ये सामील होणार असल्याच्या चर्चांना उधाण आले असून, त्यासाठी पडद्यामागे मोठ्या हालचाली सुरू असल्याचे बोलले जात आहे. या सर्व राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर आता एक अत्यंत खळबळजनक माहिती समोर आली असून, राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या नेत्या तथा खासदार सुप्रिया सुळे यांनी थेट केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतल्याचे वृत्त आहे. त्यांच्यासोबत खासदार बजरंग सोनवणे देखील उपस्थित होते. यापूर्वी खासदार शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घेतलेली भेटही राजकीय वर्तुळात मोठ्या चर्चेचा विषय ठरली होती. राज्यात एकीकडे विविध राजकीय घडामोडी आणि आंदोलने सुरू असतानाच ती महत्त्वपूर्ण भेट पार पडली होती. या जुन्या चर्चेचा संदर्भ ताजा असतानाच, आता पुन्हा एकदा खासदार सुप्रिया सुळे यांनी थेट केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतल्याने राजकीय क्षेत्रात नव्याने चर्चांना उधाण आले आहे. समोर आलेल्या माहितीनुसार, सुप्रिया सुळे यांच्या कन्या रेवती सुळे यांच्या लग्नाचे रिसेप्शन दिल्लीत आयोजित करण्यात आले आहे. त्यासाठी सुप्रिया सुळे अमित शहा यांना निमंत्रण देण्यासाठी भेटले असल्याचे बोलले जात आहे. तर बीडच्या कायदा सुव्यवस्थेबाबत खासदार बजरंग सोनवणे यांनी शहा यांना पत्र दिले असल्याचे समजते. महाराष्ट्रातील भाजप नेत्यांना दिल्लीतून संदेश या सर्व राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर, दिल्लीतील भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी राज्यातील भाजप नेत्यांना ‘शरद पवार यांचा पक्ष एनडीएत सहभागी होणार असून त्यासाठी तयार राहा’ असा संदेश दिल्याची सध्या जोरदार चर्चा आहे. ही माहिती खरी ठरल्यास लवकरच शरद पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस एनडीएमध्ये सामील होण्याची दाट शक्यता आहे. विशेष म्हणजे, खासदार सुप्रिया सुळे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेण्यापूर्वी, राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाचे खासदार सुनील तटकरे यांनीही शाह यांची भेट घेतली होती. त्यामुळे नेत्यांच्या या वाढत्या गाठीभेटी आणि दिल्लीतील घडामोडी पाहता, राज्याच्या राजकारणात भविष्यात कोणते नवे वळण येणार, हे पाहणे आता अत्यंत रंजक ठरणार आहे. या संदर्भातील ही देखील बातमी वाचा शरद पवारांनी घेतली पंतप्रधान मोदींची भेट:’नीट’ परीक्षा आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर सविस्तर चर्चा, बैठकीत नेमके काय झाले? राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे सर्वेसर्वा आणि ज्येष्ठ नेते खासदार शरद पवार यांनी आज सकाळी खासदार सुप्रिया सुळे यांच्यासह पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. विशेष म्हणजे, कालच जंतरमंतरवर जाऊन शरद पवारांनी ‘नीट’ पेपरफुटीप्रकरणी सुरू असलेल्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनास आपला जाहीर पाठिंबा दिला होता आणि त्यानंतर लगेचच त्यांनी पंतप्रधानांची भेट घेऊन शेती व शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर तसेच विद्यार्थ्यांच्या मागण्यांवर चर्चा केल्याची माहिती त्यांनी ट्विट करत दिली आहे. वाचा सविस्तर
Source link
सुप्रिया सुळेंनी घेतली अमित शहांची भेट:महाराष्ट्रातील राजकारणात खळबळ, राष्ट्रवादी शरद पवार गट NDA च्या वाटेवर? चर्चेला उधाण