![]()
डोंबिवलीत एका महिला डॉक्टरसह अन्य डॉक्टरांना मारहाण केल्याप्रकरणी अटकेत असलेले शिंदे गटाचे नगरसेवक रमेश म्हात्रे यांना मुंबई उच्च न्यायालयाने मोठा दणका दिला आहे. म्हात्रे यांच्या जामीन अर्जावर आज उच्च न्यायालयात सुनावणी पार पडली. यावेळी न्यायालयाने त्यांना तत्काळ जामीन देण्यास स्पष्ट नकार दिला असून, या प्रकरणाची पुढील सुनावणी शुक्रवारपर्यंत पुढे ढकलली आहे. त्यामुळे तूर्तास तरी म्हात्रे यांना दिलासा मिळाला नसून, जामिनासाठी त्यांना आणखी काही दिवस कारागृहातच प्रतीक्षा करावी लागणार आहे. सुनावणीदरम्यान रमेश म्हात्रे यांच्या वकिलांनी न्यायालयाला साकडे घालत, “तपास पूर्ण होईपर्यंत जिल्ह्यातूनच नव्हे, तर राज्याबाहेर जाण्याचीही आमची तयारी आहे. हवं तर अत्यंत कठोर अटी घाला, पण कारागृहातून बाहेर काढा,” अशी विनवणी केली. मात्र, आधी डॉक्टरांना मारहाण करायची आणि नंतर प्रकृतीचे कारण पुढे करत जामीन मागायचा, या आरोपीच्या भूमिकेवर न्यायालयाने तीव्र संताप व्यक्त केला. “तुम्ही मतदारांकडे जाऊन त्यांची सेवा करण्याची हमी देता, मते मागता आणि निवडून आल्यावर अशा प्रकारे मारहाण करता,” अशा कडक शब्दांत उच्च न्यायालयाने आरोपी नगरसेवकाला खडेबोल सुनावले. नगरसेवकांसह वकिलांनाही सुनावले “लोक तुम्हाला विश्वासाने मतदान करून निवडून देतात आणि निवडून आल्यावर तुम्ही त्याच जनतेची डोकी फाईल व खुर्च्यांनी फोडता, एका लोकप्रतिनिधीने असे वागणे कितपत योग्य आहे?” अशा परखड शब्दांत मुंबई उच्च न्यायालयाच्या हंगामी मुख्य न्यायमूर्तींनी आरोपी रमेश म्हात्रे यांच्या वकिलांना सुनावले. या सुनावणीदरम्यान न्यायालयाने म्हात्रे यांच्या वयावरूनही सडकून टीका केली. “रमेश म्हात्रे हे 73 वर्षांचे अजिबात वाटत नाहीत, तुम्ही त्यांच्या मारहाणीचा तो व्हिडिओ पाहिलात का? ते चक्क टेबलावरून उड्या मारून डॉक्टरांना मारत होते. आपला वेळ अजिबात वाया जाऊ नये, या आविर्भावात ते अर्ध्या सेकंदाचीही उसंत न घेता सलग मारहाण करत सुटले होते,” अशी अत्यंत संतप्त आणि खोचक टिप्पणी न्यायालयाने या प्रकरणावर केली आहे. पुढील सुनावणी शुक्रवारी या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेत, उच्च न्यायालयाने या संपूर्ण घटनेचा तपास थेट पोलिस उपायुक्त दर्जाच्या अधिकाऱ्याकडे सोपवण्याचे महत्त्वपूर्ण आदेश दिले आहेत. लोकप्रतिनिधींकडून होणाऱ्या अशा बेजबाबदार आणि हिंसक वर्तणुकीची न्यायालयाने गंभीर दखल घेतली असून, पोलिसांच्या यापुढील तपासात आणि शुक्रवारच्या सुनावणीत काय निर्णय येतो, याकडे आता सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.
Source link
"मतं मागता आणि निवडून आल्यावर लोकांचीच डोकी फोडता?":मुंबई उच्च न्यायालयाने रमेश म्हात्रेंना फटकारले, वकिलांनाही सुनावले