.

सुरक्षेसह, सुविधा नियमितपणे मिळाव्यात या उद्देशाने मनपातील ६५० कंत्राटी कर्मचाऱ्यांना अस्थायी आस्थापनेवर आणण्याचे प्रयत्न मनपा पदाधिकाऱ्यांनी सुरू केले आहेत. कारण, गेल्या १० ते १२ वर्षांपासून मनपाच्या विविध विभागात टंकलेखक तसेच संगणक ऑपरेटर पदावर कार्यरत ४७ कंत्राटी कर्मचाऱ्यांना त्यांच्याकडे शैक्षणिक पात्रता नसल्याने ते काम करण्यास पात्र नाहीत, असे कारण देत तत्काळ कामावरून कमी करण्यात आले होते. अशाप्रकारे कोणत्याही कर्मचाऱ्याला काम करताना असुरक्षित वाटू नये, नियमित वेतन, अधिकार त्याला मिळावेत, सुविधा मिळाव्यात, मनपा प्रशासनाने त्यांना सर्वसाधारण सभेच्या परवानगीशिवाय कामावरून कमी करू नये, या उद्देशाने या कर्मचाऱ्यांना अस्थायी आस्थापनेवर आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत. यासाठी मनपाला मात्र, दरमहा निधी राखून ठेवावा लागेल. कारण, मनपा वेळेत कंत्राटदाराला देयक चुकते करेल तेव्हाच या कंत्राटी कर्मचाऱ्यांना वेळेवर वेतन मिळेल. सोबतच कंत्राटदारावरही वचक राहील. तसेच कर्मचाऱ्यांच्या अनुभवाचा फायदा शहरवासीयांनाही होत राहील. कारण, या कंत्राटी कर्मचाऱ्यांना मनपाच्या प्रत्येक फाईल्स, धोरण, काम करण्याची पद्धत माहित आहे.
जे ४७ पुरुष व महिला कंत्राटी कर्मचारी कामावरून कमी करण्यात आले होते, त्यापैकी काहींचे नुकतेच लग्न झाले होते, तर काहींच्या भरवशावर संपूर्ण कुटुंब होते. त्यांच्याकडे दुसरे कोणतेही उपजिविकेचे साधन नव्हते. बरे हे ४७ कर्मचारी गेल्या १० वर्षांपासून केवळ १० हजार वेतनावर प्रामाणिकपणे काम करीत आहेत. त्यांच्याकडे कामाचा दांडगा अनुभव आहे. तरीही त्यांच्यापुढे रोजगाराचा मोठा प्रश्न निर्माण झाला होता. या कंत्राटी कर्मचाऱ्यांनी मनपा सभागृह नेते चेतन गावंडे यांची भेट घेतली. उर्वरित,पान.४ मनपाच्या ६१ कोटी १७ लाख ५६ हजार रुपयांच्या बाह्य मनुष्यबळ कंत्राटाचा मार्ग सुकर झाला आहे. नागपूर उच्च न्यायालयाने एसॉर्ट कंपनीच्या आव्हान याचिकेला खारिज केल्यामुळे मनपाची बाह्य मनुष्यबळासाठी राबवण्यात आलेली निविदा प्रक्रिया ही वैध ठरली आहे. त्यानुसार नॅकॉफ कंपनीला हे ६१ कोटी रुपयांचे कंत्राट मिळणार आहे. यामुळे मनपाला ६५० कंत्राटी कर्मचारी मिळणार असून यामुळे विविध विभागातील कर्मचाऱ्यांची उणीव भरून निघणार आहे. मनपा स्थायी समितीनेही या कंत्राटाला अंतिम मंजुरी दिली आहे. याअंतर्गत अकुशल श्रेणीतील कर्मचाऱ्यांची आवश्यकतेनुसार मनपातील सर्वच विभागात भरती केली जाते. डॉ. मंगेश गोंदावले, आयुक्त, मनपा.
त्यांच्यासाठी अंतिम संधी Q. ४७ कंत्राटी कर्मचाऱ्यांना कामावरून कमी का करण्यात आले. A. ते जे काम करीत होते, ते करण्याइतपत त्यांच्याकडे शैक्षणिक पात्रता नव्हती. Q. त्यांना कामावर परत घेतले काय? A. होय, त्यांना कामावर परत घेण्यात आले आहे. Q. कोणत्या आधारे त्यांना कामावर परत घेण्यात आले? A. त्यांच्याकडे १० ते १२ वर्षांचा अनुभव असून मानवतेच्या आधारे त्यांना कामावर परत घेण्यात आले. Q. ही त्यांच्यासाठी संधी आहे काय? A. होय, तीन महिन्यांत त्यांना टंकलेखनासह एमएससीआयटी प्रमाणपत्र सादर करावे लागेल.
अस्थायी कर्मचारी म्हणून आस्थापनेवर घेण्याचा विचार ^महानगर पालिकेत कार्यरत कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या अनेक समस्या आहेत. कधी अचानक त्यांना कामावरून कमी केले जाते तर कधी त्यांना कंत्राटदाराकडून वेळेवर वेतन, सुविधा मिळत नाहीत. ते बघता मी विरोधी पक्ष नेत्यांशी याबाबत चर्चा केली. अस्थायी कर्मचारी म्हणून आस्थापनेवर घेता येते काय, या बाबत चर्चा केली. – चेतन गावंडे, सभागृह नेते, मनपा.
नियमितपणे देयकं चुकते करावे लागणार महानगर पालिकेने जर अस्थायी कर्मचारी म्हणून कंत्राटी कर्मचाऱ्यांना नियुक्ती दिली तर त्यांना आऊटसोर्सिंगचे कंत्राट घेणाऱ्या कंत्राटदाराकडून नियमितपणे वेतन मिळावे यासाठी मनपाला कंत्राटदाराची देयकं नियमितपणे चुकती करावी लागतील. सोबतच या कंत्राटी कर्मचाऱ्यांना थेट नव्हे पण, मनपा सभागृहाकडून सुरक्षाही मिळेल. त्यांना कामावरून तत्काळ कमी करण्याआधी मनपा प्रशासनाला सभागृहाची यासाठी अनुमती घ्यावी लागेल. तसेच मनुष्यबळ कंत्राटदारही या कंत्राटी कर्मचाऱ्यांना त्यांच्या अधिकाराच्या ज्या सुविधा आहेत, त्या देण्यास बाध्य राहील.